कोल्हापूर • प्रतिनिधी
लोकांमध्ये आहारविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कै. डॉ. मा. ना. जोशी फाऊंडेशनच्यावतीने नॉर्थस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. मंगळवारी (दि.२८) सायंकाळी सहा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे हे व्याख्यान होणार असल्याची माहिती नॉर्थस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक व अस्थिरोगतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी दिली. यावेळी डॉ. सोनिया आजरेकर उपस्थित होत्या.
डॉ.जोशी म्हणाले की, स्वस्थ शरीर हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. परंतु दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढते वजन आणि त्यामुळे होणाऱ्या गुडघेदुखी, मधुमेह व रक्तदाब आदींचे प्रमाण वाढत जात आहे. यासाठी लोकांमध्ये आहारविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. याच्या प्रवेशिका नॉर्थस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपलब्ध आहेत. प्रवेशिका घेतेवेळी CBC, HBA1C (रक्तातील शुगरचे सरासरी प्रमाण) आणि शुगर या तपासण्या केवळ २००/- रूपयांमध्ये केल्या जातील. नॉर्थस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे अनेक सामाजिक उपक्रम तसेच वैद्यकीय शिबिरे आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.दीपक जोशी यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे १ जानेवारी ते २६ जानेवारी २०२२ या काळात दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त गुडघ्याच्या कृत्रिम सांधेरोपण शिबिराचे आयोजन केले असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले..