कोल्हापूर • प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात सध्या असलेला पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्क्यांवरून १० टक्केच्या खाली आल्यास जनजीवन सुरळीत होईल, असा दक्षतेचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी व्हायचा असेल तर दुपारी चारनंतर दुकानांसह सर्व आस्थापना सक्तीने बंद करा. विकेड लाॅकडाऊन कडक करा तसेच पर्यटनासाठी ये-जा करणार्यांना व एकत्र जमणाऱ्यांना बंदी करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. कागलमध्ये कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांवर गेल्यानंतर जरी तिसरी लाट आली, तरी तितकीशी धोकादायक नसेल. पॉझिटिव्हिटी रेट कमी व्हायचा असेल तर सरकारच्यावतीने सुरू असलेल्या टेस्टिंगला प्रतिसाद द्या. मास्क घाला, गर्दी टाळा. गृह अलगीकरण पूर्णपणे बंद करा. या बैठकीत आरोग्य विभागासह, शिक्षण सार्वजनिक बांधकाम, गोरगरिबांना धान्य वाटप, शेती व संजय गांधी निराधार योजनेचा आढावा श्री. मंत्री मुश्रीफ यांनी घेतला. कागल शहरातील ४५ वर्षावरील चार हजारावर नागरीकांना अजून पहिला डोस मिळाला नसल्याकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी स्वतः नगरसेवकांच्या योगदानातून लस विकत घेऊन उर्वरित सगळ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करू, अशी ग्वाही दिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, खाजगी दवाखान्याला मिळालेल्या लसीपैकी २५ टक्के विक्रीची मुभा आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कारखान्यासह, बँका, विविध आस्थापना व ऐपतदार व्यक्तीनी लस विकत घेऊन लसीकरण करून घ्यावे. त्यामुळे सरकारी लसीकरणावरील ताण कमी होऊन गोरगरिबांना लवकर लस मिळणे शक्य होईल. सहाजिकच पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्यास हातभार लागेल. या आढावा बैठकीला केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गट विकास अधिकारी सुशील संसारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरसेवक प्रवीण काळबर, सतीश घाटगे, मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम, तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, डॉ.अभिजित शिंदे आदी उपस्थित होते. ——————————————————- Attachments areaReplyForward