लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय जीवन पूर्ववत होणार नाही: मंत्री हसन मुश्रीफ


  कोल्हापूर • प्रतिनिधी
      जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत मानवी जीवन पूर्ववत होणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन या केंद्राला देण्यात आली.
       मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लसीकरणात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरेल. राज्य ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० हजार मेट्रिक टन पूर्ततेचा निर्धार केलेला आहे. कोरोनाची पहिली लाट गेल्यानंतर लग्न, निवडणुका, पर्यटन आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले. या गर्दीमुळे हा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत गेला. जनताकर्फ्यू संपला तरी अजूनही थोडी दक्षता घ्या, जागृतता बाळगा. त्याचे परिणाम निश्चितच चांगले दिसतील. गेले सव्वावर्षभर सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या या लढाईच्या आपण अंतिम टप्प्यात आहोत. जनतेने अजून थोडं सहन करावं, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.
       मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोना संपला असे वाटत असतानाच गेल्या दीड महिन्यापासून तो पुन्हा वेगाने वाढतच आहे. गेल्या दीड महिन्यातील एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी बेड पाहिजे, ऑक्सीजन बेड पाहिजे, व्हेंटिलेटर पाहिजे, रेमडीसीव्हीर इंजेक्शन पाहिजे म्हणून फोन आला नाही.
      यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पंचायत समिती सभापती सौ. पुनम महाडिक – मगदूम, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नगरसेवक प्रवीण काळबर, राजेंद्र सुतार, जयदीप पवार, राहुल महाडिक आदी प्रमुखांसह प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा देसाई, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे व डॉ. उलका चरापले,  कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *