कोल्हापूरच्या गिर्यारोहकांकडून लिंगाणा सुळका सर

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     स्वराज्याची राजधानी रायगड  व  स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणागड यांच्यामध्ये ३१०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतिदुर्गम असा हा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा. असा हा लिंगाणा सुळका कोल्हापूरचा गिर्यारोहकांनी यशस्वीपणे सर केला.
     महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाची एक प्रथा आहे. खंडेनवमीदिवशी गिर्यारोहण साहित्याचे पूजन करून गिर्यारोहणाची सुरुवात केली जाते. पण यंदा कोविड -१९ मुळे मोहीम करण्यास थोडा उशीर झाला. अनुभवी गिर्यारोहकांसाठी लिंगाण्याची चढाई तशी सोपी पण नवीन गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी ती एक आव्हानात्मक मोहिमच आहे.
      लिंगाण्याची चढाई पायथ्यापासून शिखरापर्यंत साधारण अकराशे ते बाराशे फुटांची आहे आणि यामध्ये साधारण नऊ ते दहा वेगवेगळे टप्पे  पार करावे लागतात.लिंगाणा चढाई बरोबरच लिंगाण्यापर्यंत पोहोचणे हे देखील एक मोठे आव्हानच आहे.
      लिंगाण्याची चढाई दोन टप्प्यात विभागली जाते पहिला कोल मधून सुळक्याच्या पायथ्यापर्यंत आणि दुसरा सुळक्याचा पायथा ते माथा. पहिला टप्पा हा साधारण सहाशे फुटांचा या सहाशे फुटामध्ये चढाई करत असताना एकूण पाच टप्पे (ज्याला टेक्निकल भाषेत पीचेस म्हणतात) पार करावे लागतात. हार्नेस, कॅराबिनर, डीसेंडर, सेल्फ अँकर हे सर्व गिर्यारोहण साहित्य वापरून सर्व टीम चढाईसाठी सज्ज झाली.
     सकाळी सहा वाजता सुरू केलेली पायपीट संध्याकाळी सहा वाजता मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी येऊन थांबली.
आता चढाईचा मुख्य दिवस, पहाटे चार वाजताच सगळे जण उठून तयारीला लागले होते. साधारण साडेपाचच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. पहिल्यांदा शेवटच्या दोन टप्प्याला राहिलेले रोप फिक्स करण्यासाठी मुख्य गिर्यारोहकांच्या टीमने चढाईस सुरुवात केलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गिर्यारोहकांनी सुद्धा आरोहनास सुरुवात केली. जसजसा दिवस उजळू लागला तेव्हा चढाईच्या मार्गावरील एक्सपोजरचा अनुभव सर्वांना येऊ लागला. दोराच्या सहाय्याने कमरेला सुरक्षा दोर घेऊन लिंगाण्याच्या कड्यावर आरोहण करताना पायाखाली असणारी प्रचंड खोलीची दरी पाहतांना थरकाप उडत होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास बारा वर्षाच्या कार्तिकने सर्वप्रथम लिंगाण्याचा माथा गाठला आणि त्यापाठोपाठ सर्व टीमने लिंगाण्यावर यशस्वी आरोहण केले.
माथ्यावरुन पूर्वेला राजगड, तोरणा आणि पश्चिमेला साक्षात रायगड, जगदीश्वर मंदिर आणि राजांची समाधी अगदी स्पष्टपणे दृष्टिपथात येत होती लिंगाण्यावरूनच राजांना मुजरा करून सर्व टीमने एकच जयघोष केला.
     उतरताना थोडा वेळ झाला रात्री दहा वाजता कड्यावरील सर्वरोप गिर्यारोहण साहित्य वाइंड अप करून आम्ही रात्री दहा वाजता कोलमध्ये पोहोचलो. तेथून ट्रॅव्हर्स पूर्ण करून बोराट्याच्या नाळेतून परत मोहरी गावात पहाटे दोन वाजता पोहोचलो. अशा पद्धतीने लिंगाणा मोहीम सुखरूपपणे पूर्णत्वास गेली होती.
     या मोहिमेत विनायक कालेकर, अनिकेत जुगदार व मयूर लवटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यानंद बेडेकर, राहुल कदम, अभय मोरे, प्रदीप कवतिके, कार्तिक कवतिके, अथर्व कवतिके, मलय मुजावर,राणोजी पाटील, जयदीप जाधव, अजिंक्य गिरमल, स्नेहल रेळेकर, पंढरीनाथ जाधव,अवधूत पाटील,मनोज सातपुते,हर्षवर्धन साळोखे, प्रसाद आडनाईक ,हर्षवर्धन चौगुले,मकरंद लवटे,स्वप्नील लवटे, कौस्तुभ लवटे,राजेश माने, नितेश सातार्डेकर,महेश भंडारे.अनिकेत महाजन, सतीश यादव यांनी सहभाग घेऊन मोहिम यशस्वी केली.
       जेष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, प्रमोद पाटील, मेहबूब मुजावर, ऋषीकेश केसकर यांनी या मोहिमेस मार्गदर्शन केले.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!