भविष्याचा वेध घेताना ऊर्जा वापराबद्दल आत्मियता बाळगावी: अंकुर कावळे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      चाकामुळे मानव गतिमान झाला तर ऊर्जेमुळे तो वेगवान झाला. प्रगतीचा हा वेग टिकवून पुढे वृध्दींगत करण्यासाठी अस्तित्वातील ऊर्जा साधनांच्या संवर्धनावर, नव्या ऊर्जा स्त्रोतांच्या शोधावर व वापरावर भर दिला पाहिजे. भविष्याचा वेध घेताना प्रत्येकाने ऊर्जा वापराबद्दल आत्मियता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले.
      शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर व महावितरणच्या सहभागातून जिल्ह्यातील तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर. के. सावंत, विभागप्रमुख प्रा. के. बी. कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक व्ही. के. हरलापूर, उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते, मनोज बोरगे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत ४० प्राध्यापक सहभागी झाले.
       या कार्यशाळेत विद्युत क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयाची मांडणी करताना श्री. कावळे बोलत होते. पुढे बोलताना अंकुर कावळे  म्हणाले की, ‘त्याकाळी थॉमस एडीसन यांनी एक स्वप्न पाहिले होते, आज श्रीमंतांना मेणबत्तीचा प्रकाश मिळतोय मात्र एक दिवस नक्कीच विद्युत दिव्यांमुळे गरिबांना प्रकाश मिळेल. ते स्वप्न आज सत्यात उतरले असून मेणबत्तीपेक्षा स्वस्त दरात आज विद्युत दिव्यांचा प्रकाश सगळ्यांना मिळतोय. तेंव्हा भविष्यात आपणाला ऊर्जा संकट उभे टाकू द्यायचे नसेल तर उपलब्ध संसाधने सजगतेने वापरणे अन् ऊर्जेच्या शाश्वत स्त्रोतांकडे वळणे गरजेचे आहे.
     उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा अंकेक्षण या विषयावर सखोल माहिती दिली. ऊर्जा संवर्धन कायदा २००१ ची मांडणी करताना त्यांनी संवर्धनाची गरज, उपाययोजनांबद्दल चर्चा करून नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांकडे लक्ष वेधले. सहाय्यक अभियंता अण्णासो आंबवडे यांनी सुरक्षित वीज वापराबाबत माहिती दिली. महावितरणचे लघु प्रशिक्षण केंद्र व शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्युत विभागाने कार्यशाळेचे नियोजन पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!