कोल्हापूर • प्रतिनिधी
साई चषक स्पर्धेत महाराष्ट्र क्रीडा मंडळ आणि राजर्षी छत्रपती शाहू स्पोर्ट्स अॅकॅडमी यांच्यात जेतेपदासाठी सामना झाला. अखेरपर्यंत अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळने २-१ गोलने मात करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे दि डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन आयोजित साई चषक स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. रविवारी सकाळी उपांत्य फेरीचे सामने झाले.
पहिला उपांत्य सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ विरुद्ध देवगिरी फायटर्स त्यांच्यात झाला. त्यामध्ये महाराष्ट्र क्रीडा मंडळाने ५-० गोलने एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र क्रीडा मंडळकडून पृथ्वीराज खोत, तन्मय जाधव, प्रणव चौगुले, अनिरुद्ध पाटील, पृथ्वीराज कदम यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. या विजयामुळे संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरा उपांत्य सामना राजर्षी छत्रपती शाहू स्पोर्ट्स अॅकॅडमी विरुद्ध छावा मित्र मंडळ यांच्यात झाला. शाहू स्पोर्ट्सने २-० गोलने विजय संपादन करत अंतिम फेरी गाठली. शाहू स्पोर्टसकडून ऋतुराज कदम व आयुष चौगुले यांनी गोल केले.
अंतिम सामना …..
साई चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ विरुद्ध राजर्षी छत्रपती शाहू स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीचा झाला. अखेरपर्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळाने २ विरुद्ध १ गोलने विजय मिळवून साई चषक पटकावला. या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळकडून राजगुरू जगदाळे व पृथ्वीराज कदम यांनी तर शाहू स्पोर्टसकडून ऋतुराज कदमने गोल केला.
बक्षीस समारंभ …..
स्पर्धेचा बक्षीस समारंभ अमित शिंदे, संजीव कुमार, विजय सरदार, सुदाम तोरसकर, अविनाश गवळी, राजू गवळी, समीर जाधव, मिलिंद शेलार, शिवाजी डुबल, योगेश देशपांडे, नजीर मुल्ला, सागर जाधव, गौरव खामकर, ओमकार भांडवले यांच्या हस्ते झाला.
कै.श्रीपतराव शिंदे यांच्या स्मरणार्थ अमित शिंदे यांच्याकडून स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र क्रीडा मंडळला रोख ३०००/- रूपये व चषक तर उपविजेत्या शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीला रोख २०००/- रूपये व चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे …..
• बेस्ट गोलकीपर : स्वप्नील कुराडे (शाहू ॲकॅडमी)
• बेस्ट बॅक : प्रणव सुर्यवंशी (सरदार स्पोर्ट्स)
• बेस्ट फॉरवर्ड : तन्मय जाधव (महाराष्ट्र क्रीडा मंडळ)
• बेस्ट हाफ : प्रणव चौगुले (महाराष्ट्र क्रीडा मंडळ)
• सामनावीर : पारस पाटील (शाहू स्पोर्टस् अकॅडमी)
कै. अनिल चंद्रकांत सावंत यांच्या स्मरणार्थ सुनील सावंत यांच्याकडून स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू प्रज्वल पाटील(संजीवन स्कूल ब), शाहू चौगुले (शाहू स्पोर्ट्स अकॅडमी), विवेक दुर्गुळे (देवगिरी फायटर्स), विनायक हांडे (छावा मित्र मंडळ) यांना गौरविण्यात आले.
पंच म्हणून योगेश देशपांडे, गणेश पवार, सागर जाधव, ओंकार भांडवले, सागर पोळकर, शुभम पाटील यांनी काम पाहिले.
———————————————– Attachments area