महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीचा रविवारी कोल्हापूरमध्ये शुभारंभ

Spread the love

• माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्रातील दुसरी व पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी ॲकॅडमी कोल्हापूरमधील शाहूपुरी जिमखाना येथे सुरू करण्यात येत आहे. रविवारी (दि.२४) सकाळी नऊ वाजता माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या हस्ते व खा. संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ होणार असल्याची माहिती माजी रणजीपटू व क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमी पुणेचे अनिल वाल्हेकर यांनी दिली. पत्रकार परिषदेस अमोल माने, शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, उपाध्यक्ष रमेश पुरेकर, सेक्रेटरी संजय शेटे, चाटे शिक्षण समुहाचे भरत खराटे, धवल पुसाळकर, विजय भोसले, केतन शहा आदी उपस्थित होते.
      अनिल वाल्हेकर यांनी सांगितले की, ॲकॅडमी शुभारंभप्रसंगी केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, चाटे शिक्षण समुहाचे भरत खराटे, माजी रणजीपटू शैलेश भोसले, एमसीए कमिटी सदस्य ॲड. कमल सावंत, पुणा विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक बोके आदींची प्रमुख उपस्थिती आहे.
      ते पुढे म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी यांचे खेड्यातून शहराकडे अशारितीने प्रवास करताना महाराष्ट्रामध्ये ही दुसरी ॲकॅडमी कोल्हापूरात चालू करताना ग्रामीण विभागात जास्तीत जास्त क्रिकेटचे आधुनिक पध्दतीचे क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. यामधून जास्तीत जास्त खेळाडू राज्य व देश पातळीवर खेळावेत ही संकल्पना आहे. देशामध्ये क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटचे अद्ययावत व तंत्रशुध्द पध्दतीने प्रशिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील टॅलेंटेड क्रिकेट खेळाडू राज्य व देशामध्ये चमकावेत यासाठी महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवात आरका स्पोर्टस् कंपनीने देशामध्ये केली. याच आरका स्पोर्टस् कंपनीबरोबर पुण्याच्या क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमीने करार केला आहे. शाहूपुरी जिमखाना व चाटे शिक्षण समुहाने कोल्हापूरमध्ये महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवात व्हावी यासाठी क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमी पुणे यांच्याबरोबर करार करुन त्याची सुरुवात २४ एप्रिलपासून करीत आहोत.
      ॲकॅडमी वर्षभर सुरु ठेवण्याचा मानस आहे. पावसाळ्यात इनडोअर सुविधा निर्माण करुन वर्षभर क्रिकेट कोचींग सुरु राहणार. ॲकॅडमीमध्ये १०, १२, १४, १६, १ ९ व  सिनियर अशा वयाच्या गटामध्ये विभागणी करुन सराव शिबिरे त्याचबरोबर त्या-त्या वयोगटात जास्तीत जास्त सामन्यांच्या अनुभवासाठी स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोप्या भाषेमध्ये व एकसंघ कोचिंगचे नियोजन करताना प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त २० खेळाडूंचा समावेश असणार आहे. कोचिंगचा दर्जा उच्च प्रकारचा ठेवण्यासाठी ॲकॅडमीचा मुख्य कोच हा रणजी ट्रॉफी व लेव्हल ३ चा कोच असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गटाला सहाय्यक कोच हा लेव्हल १ चा असणार आहे. कोचिंगबरोबर पालकांशी संवाद तसेच खेळाडूंना फिटनेस व आहार विषयक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देणार आहोत. या गोष्टींचा समावेश असल्यामुळे वर्षभर सरावाबरोबर सामन्याचा अनुभव देणार आहोत. यामधून मुख्य म्हणजे इनडोअर ॲकॅडमी तयार करुन मुलांना वर्षभराची सुविधा उपलब्ध होईल. आमच्या करारामध्ये आपल्या सिनियर खेळाडूंना त्यांचे क्रिकेट संपल्यावर कोचिंग, अंपायरिंग, फिजिकल ट्रेनर इतर प्रकारामध्ये नोकरी मिळण्याबाबत प्राधान्य देण्याबाबत करार केला असल्यामुळे लेव्हल १ ची परीक्षा सुविधा देताना ( नाममात्र फी भरुन ) नोकरीची हमी देण्याबाबत विचार केला असल्याचे अनिल वाल्हेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!