हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद

Spread the love

     हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. रविवारी (२९ ऑगस्ट) मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती…..
     मेजर ध्यानचंद यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद (आता प्रयागराज) जिल्ह्यात २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. ध्यानचंद यांचे वडील समेश्वर सिंह हे ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये होते. वडील ब्रिटीश आर्मीच्या हॉकी संघात असल्याने ध्यानचंद यांच्या रक्तातच हॉकी दडली होती. लहानपणी तितकसं हॉकीत लक्ष न देणाऱ्या ध्यानचंद यांनी सोळा वर्षाचे असताना आर्मी जॉईन केली. त्यानंतर त्यांची हॉकीबद्दलची आवडही वाढू लागली. ध्यानचंद हे पुढे जाऊन भारतीय हॉकीच नाही, तर जागतिक हॉकीमधील महान खेळाडू बनतील हे तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं.
    ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये १९२८ ॲमस्टर्डम, १९३२ लॉसएंजेलिस आणि १९३६ बर्लिनमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारताला हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा असणारे मेजर ध्यानचंद यांचा सन्मान भारत सरकारने केला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे. खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली आहे.
     मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जाते. त्यांनी भारताला तीन  ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.
१९२८ मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक सामना खेळणारे मेजर ध्यानचंद यांनी पहिल्याच सामन्यात तीन गोल केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एकच गोल करणाऱ्या ध्यानचंद यांनी तिसऱ्या सामन्यात मात्र डेन्मार्क विरुद्ध  तीन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. नेदरलँडमध्ये झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पाच सामन्यात सर्वाधिक १४ गोल केले. ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि, भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल आहेत. बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरची ऑलम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या ध्यानचंद यांनी त्यांच्या या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी ॲमस्टर्डम, लॉसएंजेलिस आणि बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मिळून ३९ गोल केले होते.
     १९३६ मध्ये बर्लिन येथे ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारत आणि जर्मनी हे संघ आमने-सामने असताना हज़ारो प्रेक्षकांसह जर्मनीचा हुकमशहा ॲडॉल्फ हिटलर देखील त्याठिकाणी होते. भारताने हा सामना ८ विरूद्ध १ अशा फरकाने जिंकला. ध्यानचंद यांच्या खेळाचा हिटलरही दिवाना झाला. त्याने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफरही दिली, पण मनात भारत असणाऱ्या ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकारली.
     भारत सरकारने १९५६ साली मेजर ध्यानचंद यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले नाही.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!