रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी आराखडा तयार करा

Spread the love

• प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सूचना
कोल्हापूर • प्रतिनिधी
      रंकाळा तलावात सांडपाणी मिसळणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार आज कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सरनाईक कॉलनी परिसरात पाहणी करून रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
      ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रु.१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. परंतु, रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखल्याशिवाय या सुशोभिकरणाच्या कामाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे सुशोभिकरणाच्या कामासह सरनाईक कॉलनी, शहाजी कॉलनी, हिंद तरुण मंडळ, टिंबर मार्केट या भागातून तलावात मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवासी नागरिकांनी केली होती. त्यानुसार या सांडपाणी मिसळणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार आज कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सरनाईक कॉलनी परिसरात पाहणी केली.
    यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी प्रत्यक्ष सरनाईक कॉलनी, दत्त तरूण मंडळ, श्रेयस टेरेस, पुष्कराज टेरेस आदी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक महिलांनी डॉ.बलकवडे यांचे याठिकाणी पाण्याचा साठा होत असून, त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधी आणि कचऱ्याकडे लक्ष वेधत पावसाळ्यातील दिवसांच्या राहणीमानाच्या समस्या मांडल्या.
     यानंतर बोलताना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सरनाईक कॉलनी परिसरात कोणकोणत्या भागातून पाणी साठते, या सांडपाण्याचा पाण्याचा निचरा का होत नाही, सदर पाणी कशापद्धतीने रंकाळा तलावात मिसळते, या पाण्याचा निचरा करण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग अवलंबता येईल कि याठिकाणी फिल्टर प्लँन्ट बसवता येईल, याचा सखोल अभ्यास करून रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या आराखड्यास निधी उपलब्ध करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी स्थानिक नागरिकांना दिली.
    यावेळी ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेविका सौ.तेजस्विनी इंगवले, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्य निरीक्षक दिनेश शिंदे, भाऊ करंबे, राजू सावंत, संजय सूर्यवंशी, राजाभाऊ घोरपडे, विलास वायफळकर, आबा जगदाळे, सचिन मांगले, किरण पाटील आदींसह रंकाळाप्रेमी, पर्यावरणप्रेमी व भागातील महिला व नागरिक उपस्थित होते. 
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!