पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांचा कृती आराखडा बनवा: जिल्हाधिकारी

Spread the love


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)   
     जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यमान होते मात्र काही गावात एप्रिल-मे च्या दरम्यान पाणी टंचाई जाणवते. ज्या गावात पाणी टंचाई जाणवते त्या गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याकरिता जिल्हा परिषदेने त्वरित कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.
     राजर्षी शाहूजी सभागृहात, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सदस्य सचिव अशोक धोंगे, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे, मृदू व जलसंधारणचे कार्य. अभियंता धनाजी पाटील, एमजीपीचे जे.डी.काटकर, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीकेश गोसकी, पाट बंधारे विभागाचे (उत्तर) एस.डी.काटे आदी उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा होण्याच्या दृष्टीने यंत्रणेने प्रयत्न करावेत. पाणी पुरवठा योजनेचा कृती आराखडा बनविण्यासाठी आऊट सोर्सिंगव्दारे किती अभियंते लागणार आहेत याची यादी प्रशासनाकडे द्यावी. तसेच आऊट सोर्सिंगबाबतचे टेंडर लवकरात-लवकर काढण्यात यावे, अशा सूचना यावेळी दिल्या. तत्पूर्वी जिल्ह्यातील १ हजार २५ गावात ग्रामपाणी स्वच्छता समितीची स्थापना व या गावांचा कृती आराखडा तयार झाल्याची माहिती अशोक धोंगे यांनी दिली. या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांवर झालेल्या खर्चाची , निधीची उपलब्धता, पाणी गुणवत्ता बाधित गावे, आऊट सोर्सिंगने मनुष्यबळ उपलब्धता आदींचा विस्तृत आढावा घेतला.
——————————————

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!