ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवस्वराज्य दिनाची मंगलमय गुढी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनाची मंगलमय गुढी उभारली. सकाळी नऊ वाजता बहुजन समाजाचे उद्धारक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ही ऐतिहासिक व क्रांतिकारक गुढी उभारून पूजा केली. गुढी उभारल्यानंतर गायलेल्या महाराष्ट्र गीताने अवघा आसमंत भारावून आणि दुमदुमून गेला.
      सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा सयाजी गायकवाड यांच्या पुतळ्यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.
      यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात, धर्म-भेद या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समानतेने जगण्याची शिकवण दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांनी बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार अशा अठरापगड जातीमधून बांधलेले मावळ्यांचे संघटन संपूर्ण जगालाच अनुकरणीय आहे. शिवस्वराज्य दिनाची ही मोठ्या डौलाने फडकणारी गुढी पिढ्यानपिढ्या चिरंतन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र जनतेला सांगत राहील.
        .   “भूमिका लोक आणि लोककल्याणाचीच”…..  
     मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने जनतेचे स्वराज्य निर्माण झाले. तोच ऐतिहासिक व क्रांतिकारी विचार घेऊन सरकारसुद्धा जनतेचे असतं, म्हणूनच लोक आणि लोककल्याणाची भावना घेऊनच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदामधून शिवस्वराज्याची गुढी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शिवस्वराज्य दिनाची ही गुढी हे राज्य जनतेचे आणि जनतेसाठीच असतं हा विचार कायम तेवत ठेवेल. 
      यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर महापालिकेचे आयुक्त शंकरराव गोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, विविध विषय समिती सभापती सर्वश्री सुनील गडाख, काशीनाथ दाते, उमेश परिहर, मिराताई शेटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *