शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाने मराठी भाषा संवर्धनासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. यंदाही मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत असताना त्यांनी अभिनव उपक्रम, कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातील सातत्य कायम राखावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.
     शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात येत असलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२१’चे औपचारिक उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
      सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते मराठी अधिविभागामध्ये स्थापित साहित्यिकांच्या कायमस्वरुपी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. चित्रकार सुधीर गुरव यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, विदेशी भाषा प्रमुख डॉ. मेघा पानसरे, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, उदयसिंह राजेयादव उपस्थित होते.
  पंधरवड्यांतर्गत आयोजित कार्यक्रम
       दि.१४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘लेखकसंवाद’ आयोजित केला आहे. त्यात डॉ. राजन गवस, अनिल मेहता, महादेव मोरे, मोहन पाटील, माया नारकर, कृष्णात खोत, किरण गुरव, नामदेव माळी, संपत मोरे यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी विष्णू पावले लिखित ‘पधारो म्हारो देस’ णि डॉ. सयाजी गायकवाड यांच्या ‘मराठी पोवाडा (तीन भाग)’ या ग्रंथांचे डॉ. बी.एम. हिर्डेकर यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. २० जानेवारीला  ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात प्रा. श्रीकृष्ण कालगावकर, प्रा. अरुण चव्हाण आणि प्रा. अविनाश सप्रे (अध्यक्ष) सहभागी होतील. २८ जानेवारी रोजी पंडित आवळीकर काव्य पुरस्कारांचे वितरण होईल. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सदर कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पाहण्यास उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *