मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त उद्यापासून शिवाजी विद्यापीठात विविध कार्यक्रम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग, इतिहास अधिविभाग, राज्यशास्त्र ज्ञान मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २५ ते २८ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये व्याख्यानमाला, साहित्य चर्चा, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांशी संवाद आणि कवी संमेलन यांचा समावेश आहे.
                                व्याख्यानमाला…..
      मराठी, इतिहास, राज्यशास्त्र ज्ञान मंडळ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक राजा दीक्षित यांच्या हस्ते या ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. डॉ. नंदकुमार मोरे यांचे ‘तंजावर राज्याचा भाषाविषयक दृष्टिकोन’ (दि. २५), डॉ. रणधीर शिंदे यांचे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा भाषाविषयक विचार’ (दि. २६), डॉ. राजेंद्र मगर यांचे ‘सयाजीराव महाराज यांचे भाषाविषयक कार्य’ (दि. २७) आणि डॉ. सूर्यकांत गायकवाड यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषाविषयक विचार’ (दि. २८) या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान “शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे” ही चित्रफीत प्रदर्शित केली जाणार आहे.
                                   साहित्य-चर्चा…..
      शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त २५ जानेवारीला सकाळी ११:३० वाजता ‘साहित्य चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘मराठी निसर्ग साहित्य’ या विषयावर ही साहित्य चर्चा होणार आहे. या चर्चेत सलीम मुल्ला, संदीप नाझरे आणि दत्ता मोरसे यांचा सहभाग असणार आहे.
                 साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवाद…..
     शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २७ जानेवारीस दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये साहित्यिक किरण गुरव, सोनाली नवांगुळ, संजय वाघ आणि प्रणव सखदेव या लेखकांशी श्रोत्यांना संवाद साधता येणार आहे.
हा कार्यक्रम मराठी विभागाचे फेसबुक पेज https://www.facebook.com/SUKmarathi आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ‘महाकल्याण’ युट्यूब चॅनेल https://youtu.be/QXuMmK-UEL8 वरून प्रक्षेपित केला जाईल.
                                 कवी संमेलन…..
     शिवाजी विद्यापीठाचे मराठी, इतिहास व राज्यशास्त्र ज्ञान मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री नीरजा असतील. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. म. (राजा) दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
      कवी प्रफुल्ल शिलेदार (नागपूर), रमेश इंगळे उत्रादकर (बुलढाणा), सौमित्र (मुंबई), श्रीधर तिळवे (मुंबई), प्रज्ञा दया पवार (मुंबई), मीनाक्षी पाटील (मुंबई), दिनकर मनवर (मुंबई), प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), गोविंद काजरेकर (बांदा), मनोज बोरगावकर (नांदेड), संदीप जगदाळे (पैठण) आणि जय प्रभू कांबळे (गोवा) आदी नामवंत कवी सहभागी होणार आहेत.
      या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी https://www.facebook.com/SUKmarathi या फेसबुक लिंकचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
      शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ. जगतानंद भटकर, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सचिव, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे आणि समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!