कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल आणि पहिला महापौर व स्थायी समिती सभापती शिवसेनेचे होतील, असा विश्र्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
श्री. क्षीरसागर म्हणाले की, विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न शिवसैनिकांनी साकार केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठीचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली असून, “हीच ती वेळ शिवसेनेचा महापौर करण्याची” या घोषवाक्याद्वारे महापालिका निवडणुकीस सामोरे जाण्यास शिवसेना सज्ज आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संयमी आणि कुशल नेतृत्व महाराष्ट्र राज्याने मान्य केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेस पोषक वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. गेल्या महिन्याभरात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनासंपर्क मंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याने शिवसेना महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने आणि शिवसेनेचा महापौर करण्याच्या इराद्यानेच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार आहे. ४१हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय आहे. निवडून येण्याची क्षमता असलेले इच्छूक उमेदवार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशानुसार शिवसेना लढण्यास तयार आहे, त्याचबरोबर शिवसेना स्वबळावर लढण्यास देखील तयार आहे. त्यानुसार नियोजनात्मक पद्धतीने, विकासाच्या जोरावर शिवसेनेचा महापौर करण्याचे ध्येय साध्य करू, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
इच्छूक उमेदवार उपस्थित …….
पत्रकार परिषदेस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या समवेत शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, शिवसेना गटनेते राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नियाज खान, तेजस्विनी इंगवले, महेश उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर, अजित मोरे, अभिषेक देवणे,रहिम बागवान यांच्यासह काही प्रभागातील इच्छूक उमेदवार उपस्थित होते.