• अपघातग्रस्त बेशुद्ध पेशंटला नेले स्वतःच्या गाडीतून
कोल्हापूर • प्रतिनिधी
मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांनी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या अपघातग्रस्त पेशंटला स्वतःच्या गाडीतून नेऊन नंतर ॲम्ब्युलन्समध्ये दाखल केले.
शनिवार (दि.१८) दुपारी साडेतीनची वेळ. कोल्हापूरवरून मोटारसायकलवरून मुलगीला घेऊन येणारे गोरंबेचे मच्छिंद्र सदाशिव सुतार (वय ४७) हे गोरंबेच्या घाटात अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे मोटरसायकलवरून पडले. डोक्याला जोरदार मार लागलेले श्री. सुतार रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होऊन पडले होते. त्यांच्या दोन्ही कानातून रक्त वाहत होते. त्याचवेळी कागलवरून गोरंबेकडे येणाऱ्या गोरंबेच्या माजी सरपंच दत्ता रावण पाटील यांनी तातडीने १०८ या रुग्णवाहिकेला फोन केला. कागलवरून रुग्णवाहिका अपघातस्थळी येण्यासाठी निघालीही. एवढ्यातच मुरगूडवरून कोल्हापूरला आपल्या सहकाऱ्यांसह निघालेल्या नगराध्यक्ष राजेखान जमादर यांना श्री. पाटील यांनी अपघाताची माहिती दिली. श्री. जमादार यांनी तातडीने बेशुद्धावस्थेतील मच्छिंद्र सुतार यांना आपल्या गाडीत घेतले व पुढे व्हन्नूर फाट्याजवळ अपघातस्थळी जाणाऱ्या ॲम्बुलन्सला थांबून श्री. सुतार यांना त्या रुग्णवाहिकेत दाखल केले.
त्या रुग्णवाहिकेतून प्रवीण सुतार व दत्तात्रय तोरसे तसेच पाठोपाठ स्वतःच्या गाडीतून आलेल्या माजी सरपंच दत्ता पाटील यांनी रुग्णवाहिकेतील डॉक्टरना अथायू हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
———–