कोल्हापूर • प्रतिनिधी
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोविड-१९ या साथरोगामध्ये कोरोनावर मात केलेल्या बहुतांश रूग्णांमध्ये कोविड पश्वात धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, अंगदुखी, छातीत दुखणे/धडधडणे, भिती वाटणे/चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर येथील किल्लेदार हॉस्पिटलच्या तळमजला येथे पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते २ या वेळेत हे सेंटर सुरु राहणार आहे. याठिकाणी कोवीड पश्चात होणाऱ्या लक्षणांवर मोफत उपचार व समुपदेशन देण्यात येणार आहे.
कोविड-१९ च्या पहिल्या लाटेनंतर २८ सप्टेंबर २०२०रोजी महानगरपालिकेच्यावतीने राज्यातील पहिले कोविड पश्चात केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यावेळी ४०० हुन अधिक कोविड होऊन गेलेल्या रूग्णांनी मोफत औषधोपचार घेतले होते. यास अनुसरून प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आता कोविड-१९ दुसऱ्या लाटेनंतरही कोविड होऊन बरे झालेल्या रूग्णांसाठी पोस्ट कोवीड सेंटर सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदरचे सेंटर सुरु करण्यात आले आहे. तरी कोवीड होऊन बरे झालेल्या नागरिकांना काही त्रास होत असल्यास या सेंटरवर औषधोपचार व समुउपदेशन घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.