कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठ व टीसाइड युनिव्हर्सिटी युके यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. यावेळी टीसाइड युनिव्हर्सिटीचे असोसिएट डीन (इंटरनॅशनल) प्रोफेसर केविन थॉमस, घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ अरुण पाटील, टीसाइड युनिव्हर्सिटी युकेचे रिजनल मॅनेजर नितीन भासन, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ. उत्तम जाधव आदी उपस्थित होते.
संजय घोडावत विद्यापीठाला याआधी ब्रिटिश कौन्सिलकडून टीसाइड युनिव्हर्सिटीचा ”आपत्ती व्यवस्थापन आणि रिकव्हरी” हा संयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यासाठी २ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. भारतातून ही संधी फक्त तीन विद्यापीठांना मिळाली आहे, त्यामध्ये संजय घोडावत विद्यापीठाचा समावेश आहे. या करारामार्फत विद्यार्थी व शिक्षक व संशोधनाची देवाणघेवाण, संयुक्त आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच टीसाइड युनिव्हर्सिटी युके व संजय घोडावत विद्यापीठ यांच्या संयुंक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन हा अभ्यासक्रम तसेच अन्य नवनवीन कोर्सेस राबविले जाणार असल्याची माहिती घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी दिली आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना भारत व भारताबाहेर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असणार आहेत. ब्रिटन आणि भारताच्या संबंधामध्ये शैक्षणिक देवाण घेवाण व्हावी या उद्देशाने हा सामंजस्य करार आयोजित करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन हा सध्याचा ज्वलंत विषय असून कोरोनासारखी वैश्विक आपत्ती असो वा महापुरासारखी आपत्ती असो यावर कशी मात करायची याचे व्यवस्थापन शिकविणारा हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहे.