झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियासमवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठासमवेत भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या झालेल्या सामंजस्य करारामुळे विविध संयुक्त संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, अशी अपेक्षा झेड. एस. आय.च्या पहिल्या महिला संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी येथे व्यक्त केला.
      शिवाजी विद्यापीठ व भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (झेड.एस.आय.) यांच्यात प्राण्यांविषयी आधुनिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
      डॉ. बॅनर्जी म्हणाल्या, ‘झेडएसआयच्या देशातील विविध केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले प्राण्यांचे नमुने आणि अवशेष यांचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना एक नवे दालन यामुळे खुले झाले आहे. त्याचा संशोधन विकासासाठी निश्चितच उपयोग होईल.
      यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांनी या करारांतर्गत संशोधन करून प्राणी संवर्धन व समाजोपयोगी स्वरुपाचे काम करावे. प्राणीशास्त्राबरोबरच अन्य विषयांतील संशोधकांना सुद्धा यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणे करून कराराची व्याप्ती अधिक वाढेल आणि संशोधनाचा परीघही विस्तारेल.
      या सामंजस्य कराराबाबत अधिक माहिती देताना डॉ. एस.एम. गायकवाड म्हणाले, झेड.एस.आय.चे संशोधक व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक आणि प्राणीशास्त्राचे पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थी यांच्यात संशोधनाच्या कामाची देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने करार करण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा व संशोधन प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. या कराराअंतर्गत खास करून पश्चिम घाटातील जैवविविधतेवर संशोधन होणार असल्याने पश्चिम घाटातील जैवविविधता अधिक प्रकर्षाने अधोरेखित होईल.
      करारावर प्रभारी कुलसचिव गजानन पळसे व झेड.एस.आय.च्या संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. ए.ए. देशमुख, झेड.एस.आय. (पुणे)चे ऑफिस इनचार्ज डॉ. बासुदेव त्रिपाठी आणि प्राणीशास्त्र अधिविभागातील शिक्षक, संशोधक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!