शिवाजी विद्यापीठाचा भूजल सर्वेक्षण यंत्रणेसमवेत सामंजस्य करार


कोल्हापूर • प्रतिनिधी
     राज्याची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि शिवाजी विद्यापीठाचा भूगोलशास्त्र अधिविभाग यांच्यादरम्यान काल सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भूजल सर्वेक्षणातील संशोधनास विद्यापीठाची मोठी मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया भूजल सर्वेक्षण विभाग व विकास यंत्रणा विभागाचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.
     भूजल क्षेत्रातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना संशोधनातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अद्यावत तंत्रज्ञानात्मक माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील तंत्रज्ञान, क्षेत्रीय अभ्यास यांची माहिती प्राप्त करण्याबरोबरच त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच संयुक्त प्रकल्पही राबविता येणार आहेत. या कराराअंतर्गत भूजल व भूशास्त्र विषयक विविध संशोधन उपक्रम, भूजलविषयक अध्यापन आणि प्रशिक्षण, भूजल मॉडेलिंग, पर्यावरण प्रभाव आणि विश्लेषण, सुदूर संवेदन (Remote Sensing), भौगोलिक माहिती प्रणाली व तंत्रज्ञान, भूशास्त्र व भूजल विषयक माहिती, तंत्रज्ञान व्यवस्थापन व हस्तांतरण, भूजल गुणवत्ता व पाणी तपासणी, सुविधांबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन सल्ला व आवश्यक सहाय्य, ग्रामीण विकास व कृषि क्षेत्रात सहभागाची संधी म्हणून विद्यार्थ्यांना शासकीय उपक्रमांत व योजनांमध्ये क्षेत्रीय काम करण्याची अनुमती आणि भू-भौतिक, चुंबकीय व विद्युत चुंबकीय सर्वेक्षण तसेच गुरुत्वीय व भूकंप इत्यादींबाबत संयुक्त संशोधन, अभ्यास व क्षेत्रीय काम इत्यादी घटकांसंबंधित काम करता येणार आहे.
     याप्रसंगी भूजल सर्वेक्षण विभाग व विकास यंत्रणा विभागाचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी डॉ. आर. के. कामत, भूवैज्ञानिक ऋषिकेश गोसकी, भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. शिंदे, डॉ. एस. एस. पन्हाळकर, डॉ. एस. के. पवार, डॉ. मीना पोतदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *