अस्तित्वाच्या लढाईसाठी व्यापारी रस्त्यावर

• सरसकट सर्व दुकाने चालू करण्याची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आज  सकाळी १० ते १२ या वेळेत बंद पाळला. व्यापारी आपल्या दुकानाच्या दारात फलक हातात घेऊन उभे राहिले.  लॉकडाऊनचे नियम पाळत कोणत्याही घोषणा न देता लॉकडाऊन हटवून सरसकट सर्व व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यासाठी व्यापारी व व्यावसायिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
     सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी बुधवारी  कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनातर्फे भाऊसिंगजी रोड, गुजरी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, बाजारगेट, शिवाजी मार्केट, शाहूपुरी, धान्यलाईन, पार्वती टॉकीज चौक,  बागल चौक, महानगरपालिका चौक, लक्ष्मी रोड, सुभाष रोड, बिंदू चौक,  आराम कॉर्नर, शिवाजी चौक, राजारामपुरी मेन रोड या शहरातील महत्वाच्या बाजारपेठेत कोल्हापुरातील १००० ते १२०० व्यापारी आपल्या दुकानाच्या दारात फलक हातात घेत लॉकडाऊनचे नियम पाळत कोणत्याही घोषणा न देता लॉकडाऊन हटवून सरसकट सर्व व्यापार करण्यास परवानगी द्यावी यासाठी आंदोलन केले.
    कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या भावना महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन यांनी दि. ४ जून २०२१ व जिल्हाधिकारी यांनी दि. ५ जून २०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. कोल्हापूर हे चौथ्या टप्प्यात आहे. दि. ६ एप्रिल २०२१ पासून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सो़डून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. शासनाने काढलेल्या ४ जूनच्या परिपत्रकाप्रमाणे कोल्हापुरातील फक्त जीवनावश्यक व्यवसायास सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिलेली आहे. नवीन परिपत्रकाप्रमाणे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने कोल्हापुरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्याला आज ६० दिवस उलटले आहेत. सर्व व्यापाऱ्यांना दुकान भाडे, लाईट बिल, पाणी बिल, कर्जाचे हप्ते, घरफाळा, परवाना फी, टेलिफोन बिल, विम्याचे हप्ते, कामगारांचे पगार, शासनाचे सर्व कर हे दुकान बंद असतानाही भरावे लागत आहेत. ते वेळेवर न भरल्यास त्यावर दंड व व्याज लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई अनुदानाच्या स्वरुपात ताबडतोब जाहीर करावे. तसेच व्यवसाय कर, लाईट बील, पाणीपट्टी व स्थानिक प्रशासनास सांगून घरफाळा माफ करुन व्यापाऱ्यांना मदत करावी.
कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शेजारील सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कर्नाटकातील जवळपास २०० ते २५० रुग्ण सेवा घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा पॉझिटीव्ह रेट लगेच कमी येणे शक्य नाही. हा निर्णय चुकीचा असून रुग्ण संख्या कमी नाही झाली तर आणखी किती दिवस लॉकडाऊन वाढवून सरकार व्यापाऱ्यांना वेठीस धरणार आहे असा सवालही व्यापारी व्यक्त करत आहेत.
     गेल्या दोन महिन्यांपासून जीवनावश्यक व अत्यावश्यक सोडून इतर सर्व व्यापार बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या खिशात अथवा बँकेत पैसे शिल्लक नाहीत. बहुतेक व्यापाऱ्यांची जमापुंजी संपलेली आहे. गेल्या दीड वर्षांपासून व्यापारावर फार मोठा परिणाम झालेला असल्याने बहुतेक व्यापाऱ्यांचे भांडवल संपलेले आहे.
     ६० दिवस दुकाने बंद असल्याने माल खराब होण्याची शक्यता आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, ईद, लग्नसराईचा हंगाम असल्याने सर्व माल दुकानात भरुन ठेवला होता. त्याचे पेमेंट देखील व्यापाऱ्यांना करावे लागणार आहे. ऐन हंगामामध्ये वर्षातील ४० ते ४५ % व्यवसाय होत असल्याने तो माल पडून असल्याने फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
    कोल्हापूरच्या सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे आजपर्यंत पालन केलेले आहे. व्यापारी दोन महिने घरी बसल्यामुळे त्यांचे शारिरीक व मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे व्यापारी कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. “व्यापार बंद ठेवून मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेले बरे” असे उद्गार काढत आहेत.अशी व्यापाऱ्यांची परिस्थिती होत आहे. यास पूर्णपणे शासन जबाबदार आहे. व्यापाऱ्यांवर अवलंबून असणारे घटक (कामगार, घरमालक, हमाल, टेम्पोधारक, रिक्षाधारक इ.) हेसुध्दा व्यापार बंद असल्याने अडचणीत आलेले आहेत.
     दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, कोल्हापूर कापड व्यापारी संघ, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंटस् असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस् असोसिएशन, कोल्हापूर चुडी मर्चंटस् असोसिएशन, कोल्हापूर ऑईल मिल्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघ, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, कोल्हापूर ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर प्लायवूड डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशन, कोल्हापूर स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, कांदा बटाटा व्यापारी असोसिएशन, दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र परिसर राईस मिल ओनर्स असोसिएशन, कोल्हापूर राईस मिल ओनर्स असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कोल्हापूर-कराड-सांगली शुगर मर्चंटस् असोसिएशन, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, दि कन्झ्युमर्स प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर असोसिएशन, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन, रेडीमेड गारमेंट डिलर्स असोसिएशन, कोल्हापूर स्टेशनरी कटलरी असोसिएशन या संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. तसेच या आंदोलनास अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांनी आपले व्यवहार बंद ठेवत आपला पाठींबा व्यक्त केला.   कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मद्य खाद्य विक्रेता व्यावसायिक असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा ऑप्टीकल वेल्फेअर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन यांनी पत्राव्दारे आपला पाठींबा दर्शविला.
    चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, खजिनदार हरीभाई पटेल, आनंद माने, प्रदीपभाई कापडीया, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, संपत पाटील, राहुल नष्टे, भरत ओसवाल, तौफीक मुल्लाणी, विज्ञानंद मुंढे, संभाजीराव पोवार, कुलदीप गायकवाड, जुगल माहेश्वरी, विक्रम निसार, सुधीर आगरवाल यांनी आंदोलनाचे संयोजन केले.
———————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *