• कारखाना ऑक्सीजन प्लांट उभारणार: नवीद मुश्रीफ
कोल्हापूर • प्रतिनिधी
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आठवा हंगाम घेण्याआधी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. कारखाना ऑक्सीजन प्लांट उभारणार आहे. दोन कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून दररोज दोनशे जम्बो सिलेंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मिलरोलरचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाला असून कारखान्याची हंगामपूर्व कामे वेळेत करून नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील हंगामातील २९०० रुपये मेट्रिक टनाप्रमाणे संपूर्ण एफआरपी यापूर्वीच अदा केली आहे. तोडणी वाहतुकीची बिले पूर्ण दिली आहेत. पुढील हंगामाचे तोडणी वाहतूक ॲडव्हान्स, कमिशन व डिपॉझिटचे नियोजन पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत दिली जातील.
या हंगामामध्ये २३ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेच्या प्लांटमधून एकूण दहा कोटी, ३० लाख युनिट निर्मिती झाली. दोन कोटी, ९८ लाख युनिटचा कारखान्यामध्ये वापर झाला असून आजपर्यंत सात कोटी, ३२ लाख युनिट वीज एमएसईबीला निर्यात झाली आहे. मे महिन्याअखेरपर्यंत सहवीज प्रकल्प चालणार आहे. तसेच, या हंगामामध्ये २७४ दिवस डिस्टिलरी पूर्णपणे सुरू राहील. तेल कंपन्यांना एक कोटी, ३३ हजार लिटर इथेनॉलचे करार झाले असून इथेनॉल कंपन्यांना ४० लाख लिटर पुरवठा झाला आहे. लॉकडाऊनमुळे ३६ लाख लिटर इथेनॉल स्टॉक आहे. जुलै अखेरीस एक कोटी, ३३ हजार लिटर इथेनॉल उत्पादन पूर्ण होणार असून १४ लाख लिटर रेक्टीफाईड उत्पादन झाले आहे.
ते पुढे म्हणाले, आंबेओहळ, नागणवाडी प्रकल्प दृष्टिक्षेपात आले असल्यामुळे पुढील हंगामामध्ये दहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासद व हितचिंतक यांच्या आशिर्वादावर ही गरुडभरारी मारू शकलो, याचा सार्थ अभिमान आहे.
ऑक्सीजन प्लांट उभारणार…..
नवीद मुश्रीफ म्हणाले, देशाचे नेते व आमचे दैवत शरद पवार यांनी साखर कारखानदारांना कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित करत सर्वच कारखान्यांनी ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. कारखान्याचे संस्थापक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना महामारीत संघर्ष करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कारखान्याचा ऑक्सीजन प्लांट तात्काळ उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाच गुंठे जागेत येत्या अडीच महिन्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ७० घनमीटर प्रति तास म्हणजेच दररोज २०० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे. दोन कोटी रुपये खर्चून प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. तिसऱ्या लाटेपुर्वी ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
———————————————–