‘त्या’ गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस: मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका) 
     ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.
     हातकणंगले येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. कार्यक्रमास आमदार विनय कोरे, आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पंचायत समितीचे सभापती दिपक पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
    ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास करणे, या भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा ग्रामविकास विभागाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अनेक नवनवीन योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. गावात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सरपंचानी ग्राम विकासाच्या योजना उत्तमरितीने राबविण्यासाठी पुढे यावे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी यासारख्या कामांना प्राधान्य द्यावे. विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्याही त्यांनी यावेळी दिली.
     गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली. याचा परिणाम विकासकामांवरही झाला. मात्र अशा परिस्थितीही शासन सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आरोग्याबरोबच विकास कामांनाही निधी उपलबध करुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.  कोरोना काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि सदस्यांनी चांगले काम केल्यामुळेच पहिल्या व दुसऱ्या लाटेला थोपवू शकलो. आता संभाव्य तिसऱ्या लाटेलाही आपणास थोपवावयाचे आहे. यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
     ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पंचायत समिती हातकणंगलेची नुतन इमारत चांगली आहे. या इमारतीमधून लोकाभिमुख योजना राबवून सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. इमारतीचा परिसर स्वच्छ व सुंदर करणे आवश्यक आहे. परिसराच्या स्वच्छतेसाठी ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना उत्पन्नाचे साधन निर्माण होण्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या रिकाम्या जागा विकसित करण्यास जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा,अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
               लिफ्ट व फायरसाठी निधी देणार: पालकमंत्री
     हातकणंगले पंचायत समितीच्या नुतन इमारतीमध्ये लिफ्ट उभारणीस व अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी बोलातांना सांगितले. ते म्हणाले, विकासाच्या योजना राबविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी चांगली व सुंदर इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीमधून लोकांना चांगली सेवा मिळावी. लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी लोकप्रतिनिधी बरोबरच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे. वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या निधीतून गावाच्या विकास योजनांची दर्जेदार कामे व्हावीत. या इमारतीचा वरचा मजला बांधण्यासाठी आमदार राजू आवळे यांनी त्यांच्या फंडातून निधी उपलब्ध करुन द्यावा, असे पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पंचायत समितीसाठी इमारती झाल्या आहेत. करवीर पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा. तसेच या इमारतीस  ग्रामविकास विभागाने निधी उपलबध करुन द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी आ. विनय कोरे, आ. राजू आवळे, माजी खा. निवेदिता माने, माजी आ. सुजित मिणचेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती मकानदार यांनी मनोगत व्यक्त केले. सभापती प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
     महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागात घरे बांध्यात येत आहेत. या योजनतून बांधण्यात येत असलेल्या घराच्या डेमो हाऊसचे उद्घाटन कार्यक्रमानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!