मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसीसी बँकेच्या संचालकांना दिल्या शुभेच्छा

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक आज बँकेच्या सभागृहात पार पडली. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी संचालकांना होऊ घातलेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
      सहा वर्षांपूर्वी आर्थिकरित्या बँक अडचणीत असताना विद्यमान संचालक मंडळ सत्तेत आले. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या सहा वर्षात नेत्रदिपक गरुडझेप घेतली आहे. बँकेच्या या यशाबद्दल अध्यक्ष या नात्याने मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सहकारी संचालकांचे आभारही मानले.
      अध्यक्षस्थानावरून बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सहकारी संस्था सभासद, शेतकरी बंधू, सहकारी संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव मिळाले याचा आनंद मोठा आहे.
       या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, पी. जी. शिंदे, आर. के. पोवार, अशोकराव चराटी, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे, सर्जेराव पाटील -पेरीडकर, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, रणजीतसिंह पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
                 संचालकांकडूनही अभिनंदन…..
      बैठकीत उपस्थित बहुतांशी संचालकांनीही मंत्री श्री. मुश्रीफ यांचे अभिनंदन केले. सहा वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी हाती घेतल्याच्या भावना संचालकांनी व्यक्त केल्या. प्रसंगी कटुता घेत वसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशा नेवून बँक यशोशिखरावर नेल्याचेही संचालकांनी सांगितले. बँकेचा कारभार राजकारणविरहित ठेवून शेतकरी अभिमुख धोरणे राबविल्याबद्दलही मंत्री श्री. मुश्रीफ यांचे यावेळी अभिनंदन केले.
      स्वागत प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे यांनी केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.
——————————————————- ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!