आंबेओहळ प्रकल्पाच्या शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी केला मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार

Spread the love

• स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आंबेओहळ प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच साठलेल्या पाण्यामुळे आनंदित झालेल्या कडगाव – गिजवणे व उत्तूर विभागातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला.
     यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी  आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हरितक्रांतीच्या मंदिराचा पाया रचला होता. त्यावर कळस चढवण्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले. स्वर्गीय बाबा, तुमचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले! अशी कृतार्थतेची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
     आंबेओहोळ प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी व प्रकल्पग्रस्तांनी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला. उत्तुर विभागासह कडगाव – कौलगे विभागातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त व प्रमुख कार्यकर्त्यांची मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या कृतज्ञतापर सत्कारासाठी रीघ लागली होती.
     मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर जाहीर कार्यक्रमांमधून नेहमी म्हणायचे, “उत्तूर विभागासह कडगाव- गिजवणे विभागाला वरदायिनी असलेल्या आंबेओहळ प्रकल्पाचा व  पंचक्रोशीतील विकासकामांचा पाया रचला आहे. याची पूर्तता करून हसन मुश्रीफ त्यावर कळस चढवतील.” आंबेओहळ प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पहिल्यांदाच साठलेल्या त्या पाण्यात मला साक्षात स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचा चेहरा दिसतोय, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
     माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, २० वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. पुनर्वसन व तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ झाला. यामुळे उत्तूर विभागासह कडगाव – गिजवणे विभागाच्या शेती, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघणार आहे.
    सदानंद पाटील म्हणाले, आंबेओहळ प्रकल्पामुळे उत्तूर विभागासह कडगाव- कौलगे या विभागाच्या कोरडवाहू शिवारातून हरितक्रांती नांदेल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्हा जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करून शब्द पाळला आहे.
     उत्तूर विभागाच्यावतीने माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, आजरा कारखान्याचे संचालक मारुतराव घोरपडे, विजय वांगणेकर, शशिकांत लोखंडे, दशरथ पावले, आनंदा बाबर,
कडगाव – कौलगे विभागाच्यावतीने गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब देसाई, सदानंद पाटील, संग्राम घाटगे, आकाराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!