मंत्री राजेश टोपे यांनी घेतला कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

Spread the love

कोल्हापूर • (जिमाका)
     कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टिका(लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
     कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्य मंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
     बैठकीला आ. प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, आरोग्य विभागाच्या सहायक संचालक डॉ. उज्ज्वला माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार आदी उपस्थित होते.
     मंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाधिक म्हणजेच ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. जिल्ह्याला व्हेंटिलेटर, आरोग्य विषयक सुविधा आणि आणखी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असे सांगून पुरामुळे बाधित होणाऱ्या १७१ गावांतील नागरिकांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या स्त्राव नमुन्यांची पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणी होऊन लवकरात लवकर अहवाल मिळण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.
     आरोग्य विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने गतीने कार्यवाही करण्यात येत असून जिल्हा स्तरावर देखील जलद कार्यवाही करावी, असे सांगून आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले,  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक नागरिकांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेवून आरटीपीसीआर व अँटिजेन तपासण्यांवर भर द्या. संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. गृह अलगीकरणातील नागरिकांच्या तब्बेतीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘होम आयसोलेशन ॲप’ चा वापर करा. यासाठी स्वतंत्र ‘कॉल सेंटर’ सुरु करुन यावर नियंत्रण ठेवा, असे सांगून कोरोना उपचारात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. यासाठी त्यांनी कोविड संबंधी नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार उपचार पद्धती अवलंबण्याबरोबरच नागरिकांचे समुपदेशन करावे, यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांबरोबर वेळोवेळी बैठक घेऊन मार्गदर्शन करा, असे त्यांनी सांगितले.
      तिसऱ्या लाटेमधील धोका लक्षात घेऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करा. व्हेंटिलेटर व ऑक्सिजन युक्त पुरेसे बेड तयार करा, प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवा, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वर्तणूकीचे पालन याबाबत जनजागृती होण्यासाठी नागरिकांचे ‘माहिती, ज्ञान व संवाद’वर भर द्या, अशा सूचना देऊन आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, वेळेत उपचार घेतल्यास कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होतात, यासाठी नागरिकांनी अंगावर दुखणे काढू नये. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करुन घेऊन वेळेत योग्य उपचार घ्यावा. नागरिकांनि गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर व अन्य नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केले.
     आमदार प्रकाश आवाडे यांनी मनुष्यबळ, वैद्यकीय सेवा सुविधांबाबत चर्चा केली.
     जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
     महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
     पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोरोना नियंत्रणासाठी दंडात्मक कारवाई, कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.
     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी  जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत, तसेच ७८ गावांतील ४५ वर्षावरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले.
——————————————————-
 Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!