मंत्री विश्वजित कदम यांनी केले आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     कृषी, सहकार, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत आमदार जाधव यांचे पुत्र सत्यजित, मुलगी अस्मिता मोरे, आई प्रेमला जाधव, पत्नी जयश्री जाधव तसेच कुटुंबियांशी संवाद साधून राज्यमंत्री श्री. कदम यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी जतचे आमदार विक्रम सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
      शाहू मिलच्या जागेमध्ये राजर्षी शाहू स्मारक आराखड्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न केले असून हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे, असे बंधू संभाजी जाधव व मुलगा सत्यजित जाधव यांनी सांगितले असता कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी व रोजगार निर्मिती होण्यासाठी राजर्षी शाहू स्मारकाचा आराखडा मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.
       पुण्यात झालेल्या फुटबॉल सामन्यांदरम्यानच्या आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देवून राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाची घटना ही खूपच धक्कादायक आहे. आमदार जाधव हे शांत, मनमिळावू व लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्व होते. क्रीडा, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असत, अशा शब्दांत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना राज्यमंत्री श्री. कदम यांनी आदरांजली वाहिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!