लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक युवकांचा सहभाग आवश्यक: श्रीकांत देशपांडे

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      मतदार यादीत युवकांचे प्रमाण कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक असून अधिकाधिक युवकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे प्रतिपादन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
     करवीर तालुक्यातील उंचगाव येथे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत ‘विशेष ग्रामसभा पार पडली, यावेळी ते बोलत होते. या ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, तहसीलदार शितल मुळे-भामरे, सरपंच मालूताई काळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
      ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सध्या हा कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याचे तपासून घ्यावे. मतदार यादीत नाव नसल्यास तसेच १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. नव विवाहित महिलांचा नावात बदल, दुबार नावे व मयत असल्यास नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, जेणेकरुन मतदार यादी निर्दोष व अद्ययावत तयार होईल. राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदार यादीत नाव नोंद झाल्याची खात्री करा, असेही त्यांनी सांगितले.
      श्री. देशपांडे म्हणाले, दिव्यांग मतदारांना घरुनच मतदान करता येण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने ‘पोस्टल बॅलेट’ (टपाली मतपत्रिका) ची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच पीडब्ल्यूडी ॲप (PWD App) मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतल्यास दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदवता येते व ती त्यास निवडणूक आयोगातर्फे पुरवण्यात येते. मतदारांसाठी ‘Voters Helpline App’  महत्वपूर्ण असल्याचे सांगून या अँपबद्दल तसेच निवडणूक आयोगाची भूमिका, मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबींची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
      यावेळी मतदार यादीचे वाचन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!