जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा: विश्‍वास पाटील

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ दूध संघाच्यावतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी – म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा घेण्यात येतात. ही स्पर्धा २२ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कोणतीही पूर्वसूचना न देता घेतली जाणार आहे. तरी गोकुळश्री स्पर्धेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी भाग घ्यावा, असे आवाहन चेअरमन विश्वास पाटील यांनी केले आहे.
      ‘गोकुळश्री’ स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करुन देणे तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षीत करुन दुग्ध व्यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्पर्धा गेल्या २७ ते २८ वर्षापासून सुरु केलेली आहे.  
       या स्‍पर्धेसाठी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात २० नोव्हेंबर २०२१ अखेर दूध संस्‍थेमार्फत आपली नावे नोंद करावीत. स्‍पर्धेमध्‍ये म्‍हैस १ ते ३ क्रमांक व  गाय १ ते ३ क्रमांक काढले जाणार आहेत. स्‍पर्धेचे नियम व अटी संस्‍थेना परिपत्रकाद्वारे पाठवले आहेत. तरी जास्‍तीत जास्‍त म्‍हैस व गाय दूध संस्‍थांच्‍या दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा, असे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी संघाच्‍यावतीने आवाहन केले आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!