कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यांना महापूराचा सामना करावा लागला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर देखील पूर ओसरण्याचा वेग कमी आहे. पूर ओसरण्याचा वेग मंदावल्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. यामुळे शहरांतील जलनिस्सारण व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज संसदेत प्रश्न उपस्थित केला. तसेच कोल्हापूर व सांगली शहरांमध्ये आलेल्या पूराच्या पाण्याचे निस्सारण वेगाने व्हावे याकरिता कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत विचारणा केली.
यावर उत्तर देताना केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी, अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पूराच्या पाण्याचे निस्सारण करण्याचा दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था उभारण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी दिला जातो, असे सांगत या निधीच्या माध्यमातून स्थानिक शासन संस्थेने त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे असते, असे स्पष्ट केले.
यानुसार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पूरस्थिती व जलनिस्सारण व्यवस्थापनाचा आराखडा करून कोल्हापूर व सांगली महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून यासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे सांगितले.
आज संसदेचे कामकाज फार कमी वेळ चालू शकले. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून प्रचंड गदारोळ सुरू असल्याने राज्यसभा तीन वेळा तहकूब करावी लागली. मात्र राज्यसभेच्या दुसऱ्या सत्रात वेळ मिळताच प्रश्नोत्तराच्या प्रहरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जलनिस्सारण व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला