खा. संभाजीराजे छत्रपती यांची बिकानेर पुराभिलेखागारास भेट


कोल्हापूर • प्रतिनिधी
     खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी राजस्थानमधील बिकानेर पुराभिलेखागारास भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजा जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहाचा अस्सल तहनामा याठिकाणी जतन केलेला आहे, त्याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी विशेषत्वाने हि भेट दिली.
     औरंगजेबाने स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी जेव्हा मिर्झाराजा जयसिंगास अफाट फौजेनिशी पाठवले, तेव्हा शिवरायांच्या मावळ्यांनी त्यास शर्थीची झुंज दिली. मात्र जयसिंगाच्या फौजेपुढे आपल्या सैन्याचे होणारे नुकसान रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला. हा तह “पुरंदरचा तह” म्हणून इतिहासप्रसिद्ध आहे. या तहान्वये महाराजांना २३ किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा मुलुख मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. या तहाची संपूर्ण कलमे असणारा अस्सल तहनामा सुमारे २२ फूट लांबीचा आहे. 
      याच तहावेळी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीस आग्र्यास जावे, असे ठरले होते. त्यानुसार महाराज आग्र्यास गेले असता, तिथे काय घडले, हा इतिहास तर महाराष्ट्रातील लहानथोरांस मुखोद्गतच आहे. महाराजांची आग्रा भेट, औरंगजेबासमोर दरबारात महाराजांनी दाखविलेला स्वाभिमान व करारीबाणा आणि आग्र्यातून महाराजांनी करून घेतलेली ऐतिहासिक सुटका या सर्व घडामोडींचे वर्णन करणारी मुघल दरबारातील जयपूरचा वकील परकालदास याच्या अस्सल समकालीन पत्रांची देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  याठिकाणी पाहणी केली. 
     राजस्थान सरकारने हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा अत्यंत काळजीपूर्वक व तितक्याच अभिमानाने जपलेला आहे, याबाबत त्यांचे विशेष कौतुक व आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन करीत महाराष्ट्र शासनानेदेखील आपल्या इतिहासाशी संबधित असलेली अशी प्रकाशित व अप्रकाशित कागदपत्रे महाराष्ट्रवासियांना पाहण्यासाठी देखील उपलब्ध करावीत, अशी मागणी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली.
     यावेळी राजस्थान राज्य पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *