खासदारकीचा वापर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला: धनंजय महाडिक

Spread the love

• दोनवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला खासदार केले आणि या खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाचा विकास करण्यासाठी आपण केला. केवळ स्वहित बघण्याऐवजी कोल्हापूरची शान वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. कोल्हापूरकरांनी महाडिक घराण्याला आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष अशी पदे दिली. त्यामुळे सात जन्मात कोल्हापूरच्या जनतेचे आपल्यावरील ऋण फिटणार नाही, असे मत भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केले. करवीर तालुक्यातील दोनवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
      दोनवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारती बांधण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि सरपंच सारिका जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.
     यावेळी श्री.महाडिक म्हणाले, आपल्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या कालावधीत, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विमानतळ, रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण यासह महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी खेचून आणला. सलग तीनवेळा संसदरत्न, लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझा सन्मान झाला. हा सन्मान माझा नसून कोल्हापूरच्या जनतेचा आहे. यशापयश गौण आहे. माझ्याकडे पद नसलं तरी विकास कामांसाठी निधी आणण्याची आपल्यात ताकद असल्याचे त्यांनी नमुद केले. केंद्रातील भाजप सरकारने कोरोना काळात देशातील ९० कोटी जनतेला मोफत धान्य देऊन जगण्याची उमेद दिली. जगातील कोणताही देश असा उपक्रम हाती घेवू शकला नाही. मोफत लसीकरणाची मोहीम राबवून कोरोना विरोधातील लढाईमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
     महाडीक यांनी ७ लाख रूपयांचा निधी दिला म्हणूनच ग्रामपंचायतीचे नवीन कार्यालय उभारता आले, असे संभाजी पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपसरपंच चिंतामन कांबळे, दिलीप जाधव, दिपाली कदम, वसंत पाटील, चिंतामणी गुरव, ग्रामसेवक संभाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!