महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ” तो ” निर्णय चुकीचा : भाजपा युवा मोर्चा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ ६ वेळा व ओ.बी.सी प्रवर्गातील उमेदवारांना फक्त ९ वेळा परीक्षेची संधी मिळणार आहे. आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा व खुल्या आणि ओ.बी.सी प्रवर्गातील उमेदवारांची गळचेपी करणारा आहे.
     उमेदवारांचे करियर पणाला लावणारा कमाल संधी मर्यादाचा नियम मागे घेण्यात यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे  तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
     याबाबतचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयामधील तहसीलदार कणसे यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे – पाटील, प्रदेश सदस्य विराज चिखलीकर, संघटन महासचिव विवेक वोरा, सरचिटणीस गिरीष साळोखे, उपाध्यक्ष वल्लभ देसाई आदी उपस्थित होते.
     भाजपा युवा मोर्चाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत दर्जा व संधीची समानता हा शब्दप्रयोग आहे, मात्र खुल्या आणि ओ.बी.सी प्रवर्गातील समाजावर संधीची मर्यादा घातल्याने राज्यघटनेतील या शब्दप्रयोगाचा शासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. परीक्षा देण्यासाठी संधीची मर्यादा आल्यामुळे उमेदवार तणावाखाली येतील व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकणार नाहीत. या निर्णयामुळे परीक्षार्थींच्या संख्येमध्ये घट होणार असून यामुळे परीक्षेची गुणवत्ता ढासळणार आहे. तसेच खुल्या आणि ओ.बी.सी प्रवर्गातील उमेदवारांमध्ये परीक्षेबाबतची उदासिनता तयार होणार आहे.
      आयोगाची ही भूमिका म्हणजे खुल्या आणि ओ.बी.सी प्रवर्गातील समाजावर  शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत मागे खेचण्याचा प्रयत्न ठरेल.  त्यामुळे मराठा व इतर समाजातील उमेदवारांचे करियर धोक्यात येणार आहे. आणि हा आयोगाचा निर्णय सरकारच्या पाठबळाशिवाय होऊ शकत नाही. ठाकरे सरकारचा कारभार हम करे सो कायदा ! या पद्धतीने सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाचा आणि या ठाकरे सरकारचा हा आंधळा कारभार खपवून घेतला जाणार नाही. उमेदवारांचे करियर पणाला लावणारा कमाल संधी मर्यादाचा नियम मागे घेण्यात यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
———————————————–

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!