महावितरणकडून विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख विद्युत विश्वाची’ या उपक्रमास प्रारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणच्या कोल्हापूर मंडळाच्यावतीने सांगली येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकरिता वेबिनारद्वारे ‘ओळख विद्युत विश्वाची’ या प्रशिक्षण उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. आज रविवारी पाहिले प्रशिक्षण सत्र संपन्न झाले.
     पहिल्या प्रारंभीक सत्रात महावितरणच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे नववी व दहावीच्या वर्गात शिकणारे ४० पाल्य सहभागी झाले.
वीज ही एक अदृश्यशक्ती आहे. आजच्या याकाळात वीज म्हणजे केवळ प्रकाश नव्हे तर ती शिक्षण, मनोरंजन, आरोग्य या गरजांच्या पूर्तीकरिता महत्वाचा घटक बनली आहे. तेंव्हा जीवनावश्यक वीजेबद्दलची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने  ‘ओळख विद्युत विश्वाची’ या विषयावरील प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
      विजेच्या  निर्मिती स्रोतानुसार जल, सौर, पवन, औष्णिक  व आण्विक ऊर्जा याबाबत माहिती,  वीजनिर्मिती ठिकाणापासून आपल्या घरापर्यंत मैलांचा प्रवास करीत ती कशी पोहचते ?  या वहन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरची उपकेंद्रे, मनोरे, विद्युत खांब , रोहित्र , वीज वाहिन्या ही विद्युत यंत्रणा आणि तिची रचना व कार्य? वादळ, ऊन, वारा, पाऊस, पक्षी, प्राणी इत्यादीमुळे विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे तांत्रिक दोष व त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे, कोणत्या परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांचे कार्य चालते, आपल्या घरातील विद्युत मांडणी, उपकरण क्षमतेनुसार ती कशी असते, वीज सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (इ एल सी बी ) चे विद्युत सुरक्षेतील महत्व अशा सर्व प्रश्नांचा उलगडा करीत विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे निरसन करण्यात आले.
      कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे.  ‘सुरक्षा प्रथम’ हे तत्व केंद्रस्थानी ठेऊन सातत्याने विद्युत क्षेत्राशी निगडीत सर्व घटक  वीज सुरक्षेबाबत प्रशिक्षित व्हावीत, या करिता श्री. कावळे हे आग्रही असतात. सांगली प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरी ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा पध्दतीने विषय मांडणी केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कौतुक केले आहे.
सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता शिल्पा जोशी यांनी केले. तर प्रशिक्षण आयोजनासाठी उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!