महावितरणकडून पूरबाधित कृषिपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी कामांना वेग

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे नदीकाठासह गावभागातील वीज खांब, रोहित्रे जमिनदोस्त झाल्याने तसेच वीजतारा तुटल्याने ३ लक्ष ४० हजार वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. महावितरणकडून महापुरानंतर घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे या वर्गवारीतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिले गेले.
     महापूराशी दोन हात करीत आपातकालीन स्थितीत महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन बहुतांश वीजपुरवठा केवळ ७ ते ८ दिवसांच्या आत सुरळीत करण्यात यश मिळविले. जवळपास २ लक्ष ६२ हजार बाधित वीजग्राहकांना पुन्हा वीजसेवा उपलब्ध करून दिली. पुराचे पाणी ओसरून चिखल कमी झाल्याने आता पूरबाधित कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यावर महावितरणकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ७७ हजार पूरबाधित कृषिपंपापैकी २९ हजार कृषीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.
      दुर्गम – अतिदुर्गम व नदीकाठच्या भागात चिखल – गाळ, पुराचं पाणी असल्याने तांत्रिक दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य पोहचवणे, नादुरुस्त रोहित्रे बदलून तिथे नवीन रोहित्र बसविणेकरिता रोहित्रांची, वीज खांब व वीज तारा इ. ची वाहतूक करणे अशक्यप्राय होते. त्यामुळे कृषीपंप व काही इतर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत होण्यात अडचण आली. पुराचे पाणी ओसरून चिखल कमी झाल्याने साहित्य वाहतुकीसाठी रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे पूरबाधित कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामांना वेग देण्यात आला आहे. कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी पुरबाधित कृषिपंपाचा वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे कामांचा आढावा घेऊन कामे लवकर पुर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
     जयसिंगपूरच्या पेठवडगाव उपविभागात घुणकी येथील उच्च व लघुदाब २७ वीज खांब उभारणी करून त्यावरील वीजतारा ओढून २३ वितरण रोहित्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे कृषीपंप व इतर ८२० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. खोची येथेही उच्च व लघूदाब ५८ वीज खांब उभारणी करून त्यावरील वीजतारा ओढून घेण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर ग्रामीण १ विभागातील फुलेवाडी, कदमवाडी, पन्हाळा या उपविभागातही युध्दपातळीवर कामे सुरू आहेत.    
=========================== Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!