कोल्हापूर • प्रतिनिधी
मुडशिंगी ३३/११ के. व्ही. उच्चदाब वीज वाहिनीवर अज्ञात इसमाने मंगळवारी (दि.२९) लोखंडी साखळी टाकल्याने कोल्हापूर शहरातील घाडगे पाटील, सायबर व शाहू मिल या तीन ३३/११ के. व्ही. उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद पडला. त्यामुळे ३८ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १:२० ते ३:३० यावेळेत विस्कळीत झाला. यात महावितरण कंपनीचे १ कोटी २५ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी महावितरणकडून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांनी ३३/११ के. व्ही. मुडशिंगी वीजवाहिनी बंद पडल्यानंतर केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली. वीजकर्मचाऱ्यांनी लोखंडी साखळी बाजूला काढून वीज पुरवठा पूर्ववत केला. या प्रकारामुळे झालेल्या वीजग्राहकांच्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे.
महावितरण कंपनीच्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जनतेत महावितरण विरोधात रोष पसरविण्याचे हेतूने हा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ (२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.