महापालिकेच्या शाळा ऑनलाईन सुरु

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महापालिकेच्या प्राथमिक शाळा कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे आजपासून (दि.१५) शहरातील शाळा ऑनलाईन सुरु करण्यात आलेल्या आहेत.
     महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन प्रवेशासाठी शाळास्तरावर लिंक तयार करुन लिंकद्वारे ऑनलाईन पटनोंदणी प्रक्रिया राबविली आहे. तर काही शाळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत प्रत्यक्ष पालकांच्या उपस्थितीत प्रवेश प्रक्रिया राबविलेली आहे. महापालिकेच्या शालेय पटनोंदणी उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
     महानगरपालिकेच्या ५८ प्राथमिक शाळांनी “शाळा नाही पण शिक्षण आहे” या उपक्रमाची उत्तम प्रकारे सुरवात केलेली आहे. मंगळवार, दि. १५ जून २०२१ पासून शाळेच्या पहिल्या दिवशी ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम महापालिकेच्या शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल आहे याची माहिती घेतली. बहूतांशी पालकांकडे ॲन्ड्राईड मोबाईल व टि.व्ही. असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनी पहिल्याच दिवसापासून Google Meet, Webex Meet, Macrosoft Teams, Zoom या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अध्यापन सुरु केले आहे. त्यामूळे इतर पालकवर्ग महानगरपालिका प्राथमिक शाळांकडे आकर्षित होत असून महापालिका पटसंख्येत वाढ होत आहे.
      काही शिक्षकांनी स्वत:चे असे शैक्षणिक व्हिडीओज् तयार केलेले आहेत. ते वारंवार पालकांशी संपर्क ठेवत आहेत. पाल्याच्या अभ्यासाची माहिती घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करुन घेतले असून शासनाच्या दिक्षा ॲपचा अध्ययन व अध्यापनासाठी वापर करणेबाबत सूचित केले आहे. शाळेमध्ये नियोजनाप्रमाणे अभ्यास होत असलेबाबत शिक्षण विभागाकडून पाठपुरावा केला जाणार आहे.
     लॉकडॉऊनच्या कालावधीत अनेक कुटूंबे मुंबई, पुणे येथून कोल्हापूरात स्थलांतरीत झाली आहेत. त्यांच्यासमोर आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा प्रश्न होता. मुलाला कोणत्या शाळेत घालावयाचे, शैक्षणिक साहित्य, दाखला कसा मिळवावयाचा इत्यादी प्रश्न त्याच्यासमोर होते. अशा पालकांच्या भेटीही महानगरपालिका शिक्षकांनी घेतल्या व त्यांच्या शंकाचे निरसन केले. ऑनलाईन अभ्यासाविषयी माहिती दिली. यानंतर त्यांना त्यांच्या सोयीच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला.
     ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाहीत अशा पालकांना टि.व्ही.वरील शैक्षणिक मालिकांविषयी शिक्षकांनी माहिती दिली. सर्वच विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा लवकरच करण्यात येणार आहे. त्याचाही चांगला फायदा मुलांच्या अभ्यासासाठी होणार आहे. शासनाचे पुढील आदेश होईपर्यत शाळा ऑनलाईनच सुरु राहणार असल्याचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!