भर रस्त्यातच मंत्र्यांची गाडी अडवून आजीने मांडले रस्ता व गटारीचे गाऱ्हाणे

Spread the love


        
• मंत्री मुश्रीफ म्हणाले, हीच खरी लोकशाही!
कोल्हापूर • प्रतिनिधी
     बानगे (ता.कागल) येथे भर रस्त्यातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी अडवून श्रीमती येसाबाई गणपती मगदूम या ८० वर्षाच्या आजीने घरासमोरील गटारीचे गाऱ्हाणे मांडले.
     कागल तालुक्यातील बानगे या पूरग्रस्त गावातील पूरबाधित गल्ल्यांची पाहणी करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आपल्या गाडीतून परतत होते. एवढ्यातच ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर समोरील चौकात श्रीमती येसाबाई गणपती मगदूम ही ८० वर्षाची आजी चक्क मुश्रीफांच्या गाडीसमोरच उभी ठाकली. पाठीमागून आलेल्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे त्या आजीबाईला दूर करण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु;  मुश्रीफानी तसे न करू देता, त्या आजीचे गाऱ्हाणे शांतपणे ऐकून घेतले. ती सांगू लागली , ‘पावसाचं पाणी आमच्या घरात येतय, तेवढी गटार करून टाका’. यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘मावशी…., त्या गटारीचे तर काम करूच, तुझ्या घरासमोरील रस्त्याचेही काम करून टाकू’. ग्रामस्थांशी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेली तीस-पस्तीस वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात गोरगरीब जनतेच्या पाठबळावरच यशस्वी वाटचाल करीत आलो आहे. जनता आणि माझी नाळ अतूट आहे, ती घट्ट जुळलेली आहे. एखादी ८० वर्षाची आजी बिनदिक्कतपणे रस्त्यातच माझी गाडी अडवून आपले गाऱ्हाणे सांगू शकते, त्याचीच ही प्रचिती आहे.
            .   “हीच खरी लोकशाही……..!”
     यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान असताना एका जाहीर सभेसाठी गाडीतून उतरून चालत चालले होते. त्यावेळी अशाच एका म्हातारीने त्यांच्या हाताला धरून विचारले होते, लोकशाही – लोकशाही म्हणताय ती कुठे आहे? त्या वेळी यशवंतराव चव्हाण यानी त्या म्हातारीला दिलेले उत्तर मोठे समर्पक होते. श्री. चव्हाणसाहेब म्हणाले होते, ‘आजी एका उपपंतप्रधानाला रस्त्यात हाताला धरून प्रश्न विचारतेस हीच खरी लोकशाही……!’

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!