कोल्हापूर • प्रतिनिधी
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर” या मोहिमेला आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात सुरवात झाली. यामध्ये कोल्हापुरातील ५० स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. या स्वयंसेवी संस्थांबरोबरच पाचशेहून अधिक वृक्षप्रेमी कोल्हापूरकरांनी वैयक्तिकपणे ठिकठिकाणी या मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. शहरात ठिकठिकाणी जावून झाडावरील खिळे, फलक, तारा, अँगल काढून झाडांना नवसंजीवनी दिली.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम राज्यभर राबविण्यात यावी असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.
‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देत असतानाच आहे ती झाड महत्वाचे ठरते, झाडांनादेखील संवेदना असतात, हे आपण विसरून अनेक ठिकाणी झाडांवर खिळे, फलक, तारा, अँगल, लोखंडी ब्रॅकेट मारले जातात. यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन “खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहीम राबविण्याची संकल्पना शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या समोर मांडली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, कायद्यानुसार झाडांना इजा पोहचविणे, त्याच्यावर खिळे मारणे अशा प्रकारचे कृत्य गुन्हा ठरत असल्याने, यापुढे झाडावर खिळे मारणे अथवा बोर्ड लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या संदर्भातील सूचना कोल्हापूर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत. पर्यावरणाची होत असलेली हानी आणि येणाऱ्या काळात वृक्ष संपदेची गरज लक्षात घेता, केवळ कोल्हापुरात ही मोहीम मर्यादित न राहता राज्यभर अशा प्रकारची मोहिम लोकांनी हाती घ्यावी.
मोहिमेत सहभागी सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी कटवानी, पक्कड, शिडी यांच्या साहाय्याने झाडांवरील खिळे काढले. अनेक ठिकाणी एका झाडावर तीस ते चाळीस खिळे असल्याचे आढळले. काही झाडावर असलेले लोखंडी ब्रॅकेट, साखळ्या काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. बरीच वर्षे झाडांमध्ये रुतून बसलेले खिळे तसेच करकचून बांधण्यात आलेल्या तारा काढल्यामुळे या झाडांनी मोकळा श्वास घेतला.
रोटरी क्लब ऑफ करवीर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, शहर युवक काँग्रेस, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, निसर्ग मित्र, मैत्रेय प्रतिष्ठान, व्हाईट आर्मी, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इजि. एन.एस.एस विभाग, एनएसयूआय कोल्हापूर, बाल विकास संस्था, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर ट्रॅव्हल एजंटस् असो., जिल्हा युवक काँग्रेस, राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आर्ट फौंडेशन, विज्ञान प्रबोधिनी आदींसह पन्नासहून अधिक स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.