डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून उद्या राष्ट्रीय निषेध दिन

Spread the love

• केएमएच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव यांची माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी:
     “वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी व हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा” याकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून शुक्रवारी (दि.१८) राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमध्ये हा निषेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     कोल्हापूर जिल्ह्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने उद्या (दि.१८) संपूर्ण कामकाज काळ्या फिती लावून करण्यात येणार आहे. तसेच जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनाही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये निषेधाचे फलक लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण ४५ हजार आय.एम.ए.चे सदस्य यात सहभागी होणार आहेत, असे डॉ. आशा जाधव यांनी सांगितले.
      तसेच इतर सर्व वैद्यकीय संघटना यामध्ये फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), होमिओपॅथी
असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) यांचाही पाठिंबा असल्याचे डॉ.आशा जाधव यांनी सांगितले.
     डॉ. जाधव म्हणाल्या की, जानेवारी २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ ची साथ ही एक आंतरराष्ट्रीय चिंतेची आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केले. भारतात ही साथ साधारण मार्च २०२० च्या आसपास सुरू झाली. तेव्हापासून आजतागायत जगात १७.५ कोटी, भारतात २.९५ कोटी आणि महाराष्ट्रात ५९.०८ लाख लोक या विषाणूचे संसर्गामुळे आजारी पडले. अनेक लोकांनी आपले प्राण त्यात गमावले.  या आजाराचा सर्वसाधारण जागतिक मृत्युदर २.१६ टक्के आहे. सुदैवाने भारतात हा मृत्युदर १.२७ टक्के आहे.   सर्वसाधारण शासकीय आकडेवारी बघितली तरी शासकीय कोविड  काळजी केंद्राच्या किमान चारपट ही खाजगी कोविड हॉस्पिटल्स आहेत. असे असतानादेखील दुर्दैवाने गेल्या दीड वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर आणि रुग्णालयांमध्ये जास्त हल्ले व्हायला लागले आहेत. अगदीच मागच्या दोन आठवड्यांमध्ये जरी विचार केला तरी आसाम ,पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश अशा सर्व ठिकाणी रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तर गेल्या दीड वर्षात रुग्णालयातील शारीरिक हिंसाचाराच्या १५ घटना घडलेल्या आहेत.
      अशा रीतीने रुग्णालयावरील हिंसाचार, आरोग्य यंत्रणावरील हिंसाचार ही अतिशय काळजी करण्याची चिंताजनक गोष्ट आहे. रुग्णालयांवर हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा आंध्रप्रदेश ने नव्वदच्या  दशकात केला. त्यानंतर आजतागायत भारतात २२ राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. आरोग्य हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय घटनात्मकदृष्ट्या असल्यामुळे हे कायदे राज्यांनी केले असे आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रात, महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना आणि वैद्यकीय व्यवसायिक हिंसाचार प्रतिबंध आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा २०१० हा अस्तित्वात आहे. परंतु गेल्या ११ वर्षांत या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यासाठी आता सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी याविरोधात लढा उभारण्यासाठी उद्याचा निषेध दिन हे त्यातील पहिले पाऊल आहे.
     यावेळी केएमएचे सचिव डॉ. किरण दोशी, खजानिस डॉ. ए. बी. पाटील, सल्लागार समिती सदस्य डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ.रमाकांत दगडे, डॉ. नीता नरके, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ. शीतल देशपांडे, डॉ. पद्मराज पाटील, डॉ. निरुपमा सखदेव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!