कोरोनाच्या आचारसंहितेचे पालन करुन साधेपणाने होणार राष्ट्रीय मतदार दिवस..!

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कोविड आचारसंहितेचे पालन करुन यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम मंगळवार, दि.२५ जानेवारी रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
     राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाच्या तयारीची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आकाशवाणीच्या प्रसारण अधिकारी तेजा दुर्वे तसेच महानगरपालिकेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर संबंधित विविध विभागांचे अधिकारी आभासी पद्धतीने उपस्थित होते.
     उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले, यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका’ ही थिमआहे. या थिमवर लक्ष केंद्रित करुन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीमुळे थेट लोकसहभाग न घेता वेबिनार, सेमिनार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व समाज माध्यमाद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदार जनजागृतीपर संदेश देण्यात येतील.
     श्री.कांबळे म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत यावर्षीचा कार्यक्रम साजरा करण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये मतदार जनजागृती विषयी घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
     दरम्यान, जिल्ह्यातील प्रेरणादायी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांग, तृतीय पंथीय व्यक्ती, उपेक्षित घटक यांच्यामधील आयकॉन व्यक्तींचे संदेश प्रसारित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!