वैद्यकीय शिक्षणातील संधींचा विस्तार गरजेचा: कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के

Spread the love
•डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात
कोल्हापूर • प्रतिनिधी
       रशिया आणि युक्रेन युद्धासारख्या घडणाऱ्या जागतिक घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. तिकडे जाण्याचा असलेला कल आणि परत येणाऱ्या मुलांचे भवितव्य पाहता भविष्यात मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक संधींचा विस्तार होण्याची आवश्यकता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांनी मांडली.
      डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ शनिवारी हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला  बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आम. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र- कुलगुरू डॉ. शिल्पा शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी.लिट. तर ख्यातनाम वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव  यांना डी.एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले तर डॉ. धनाजी मालवेकर यांना एक्सलन्स इन रिसर्च म्हणून सन्मानित करण्यात आले.
      कुलगुरू शिर्के यांनी रशिया व युक्रेनमधील संघर्षाचा संदर्भ देताना तेथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले  विद्यार्थी  भारतात परतत आहेत. या घटनेनंतर उर्वरित शिक्षणाचे काय? आणि वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना इतक्या लांब का जावे लागते हे दोन प्रश्न निर्माण झाले आहेत. याची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. सरकारला विशेष धोरण तयार करावे लागेल, त्यापेक्षाही  मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक संधींचा विस्तार करून यावर यावर शाश्वत  उपाय काढता येऊ शकतो असे डॉ. डी. टी शिर्के यांनी सुचवले.
       कोरोना काळात डॉ.संजय डी.पाटील आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील ग्रुपने सामाजिक भावनेतून केलेल्या कामाचा मी साक्षीदार आहे. रुग्ण त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कुटुंबाप्रमणे जपले हे अत्यंत अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. आपल्याच विद्यापीठातील सहकारी डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. एस. आर. यादव यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
       वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणे हे नक्कीच कठीण आहे. या व्यवसायात आपले नाव कमावण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. मात्र, या क्षेत्रात मिळणारा मान आणि सन्मान अतुलनीय आहे. एक चांगला डॉक्टर, स्वत:पेक्षाही इतरांचा जीव वाचवण्यास प्राधान्य देतो. आपण आपले सर्वोत्तम कौशल्य वापरून समाजाचे आरोग्य सुदृढ बनविण्यात नक्कीच पुढाकार घ्याल याची खात्री आहे. नाव, कीर्ती व संपत्ती मिळवण्यापेक्षा उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
         अत्याधुनिक सुविधा देणार: डॉ संजय डी पाटील
     आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांसह पदवी पदविका विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे कार्य करावे, आधुनिक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                 सतत शिकत रहा: डॉ. मुदगल
      डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुद्गल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडत मिळालेले पुरस्कार, विद्यापीठाने गाठलेले माईलस्टोन यांची माहिती दिली. वेगवान जगात टिकायचे तर सतत शिकत राहा, नावे ज्ञान-कौशल्ये आत्मसात करा. समाजाला व जगाला आरोग्यसंपन्न बनविण्यात आपण सर्वजण निश्चितच महत्वपूर्ण योगदान द्याल याची खात्री आहे.
        यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुचीत्राराणी राठोड, माजी कुलगुरू ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. बी. साबळे,  ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, डी. वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डीचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेघराज काकडे, अजितराव बेनाडीकर, सीएचआरओ श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह गुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                      ३६१ विद्यार्थ्याना पदवी
      १४ जणांना पीएच.डी, २० जणांना एमडी, १३ एम.एस. मेडीकल फिजिक्स, ६ एम.एस मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, ५ एम.एस. स्टेम सेल अंड रीजनरेटिव्ह मेडिसिन, २० एमएस नर्सिंग, १५८ एमबीबीएस, ४७ बी.एस्सी नर्सिंग, २५ पोस्ट बेसिक नर्सिंग, २१ डीएमएलटी आणि २३ ओटी टेक्निशियन पदवी व पदविका यावेळी प्रदान करण्यात आल्या.
                        ९ जणांना सुवर्ण पदक
       गुरूपाल सिंग(एमबीबीएस), मोनिका भोंडे (बी.एस्सी नर्सिंग), प्रीती काळे (पी.बी. नर्सिंग), प्रियांका निंबाळकर (एम.डी.), सरहद पत्की (एम.एस.), निवेदिता पाटील (एम.डी-सब्जेक्ट), प्रथमेश फडके व तेजल राव, अंकुर जैन या ९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तर डॉ. धनाजी मालवेकर यांचा एक्सलन्स इन रिसर्च अवार्डने सन्मान करण्यात आला.
           वनस्पतीमुळेच मिळाली ओळख: डॉ यादव
      सत्काराला उत्तर देताना, डॉ. एस.आर. यादव म्हणाले, शाहूनगरी जागतिक पातळीवरील मेडिकल हब म्हणून पुढे येण्यास डी.वाय. पाटील विद्यापीठाचे योगदान महत्वाचे आहे. कोल्हापुरात सर्व प्रकारची फुले, वनस्पती आढळतात. वनस्पती आहेत म्हणून मानवी जीवन आहे. वनस्पतींनीच मला ओळख दिली. वनस्पतीविना मानवी जीवन व प्रगती अशक्य आहे. विद्यापीठ संवर्धन मोहीम राबवतेय, त्याला इतरांनी ही हातभार लावावा.
      सत्काराला उत्तर देताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले,  माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण. बहुजन समाजाला शिक्षण मिळावे यासाठी शाहू महाराज यांनी केलेले कार्य आणि त्याचे परिणाम मी जवळून अनुभवले. छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि छत्रपती ताराराणी हे पराक्रमी असूनही त्यांची म्हणावी तितकी दखल घेतली नाही, म्हणून त्यांच्यावर अभ्यास ठरवून केला. कोल्हापुरात कृष्णाबाई केळवळकर ही पहिली महिला शाहू महाराज यांच्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात गेली. मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून शाहू महाराज यांनी नियुक्ती केली. इंदुमती राणी या विधवा सुनेलाही शाहू महाराज यांनी दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षनासाठी पाठवले. राजाराम महाराज यांची दोन स्वप्ने, त्यातील एक शिवाजी विद्यापीठ स्थापना आणि दुसरे होते ते मेडिकल कॉलेज काढण्याचे. आणि हे दुसरे स्वप्न डी.वाय. पाटील यांनी पूर्ण केले.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!