अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी

• अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तसेच एकूण ५०० रुपयांची अनामत रक्कम पाच समान मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध आहे. 
     राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
     महावितरणकडून वीजजोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी व इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.
     अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेबाबत अधिक माहिती www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
          कृषिपंपाच्या वीजजोडण्यांसाठी विविध योजना…..
     घरगुती वीजजोडणीसह कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरीबांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणकडून प्राधान्य देण्यात येत आहे. ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषीपंप वीज धोरण २०२० मध्ये अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक प्रवर्गातील कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) तसेच महाज्योती योजना, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद इत्यादी महामंडळांनी लाभार्थ्यांसाठी संपूर्ण अंदाजपत्रकीय रकमेच्या (प्रोसेसिंग शुल्क व अनामत रकमेसह) अनुषंगाने निधी उपलब्ध करून दिल्यास महावितरणकडून तातडीने व प्राधान्याने कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी महत्वाच्या सौर कृषिपंप वीजजोडणीसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा ठेवण्यात आला आहे.
     यासोबतच अनुसूचित जाती/नवबौद्ध आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून अनुक्रमे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ आणि ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनांमध्ये नवीन विहिरीसह कृषीपंप संच आदींसह नवीन वीजजोडणी आकाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या प्रस्तांवाप्रमाणे संबंधीत लाभार्थ्यांना देखील महावितरणकडून तातडीने कृषिपंपांची वीजजोडणी देण्यात येत आहे.
———————————————–
 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *