कोल्हापूर • प्रतिनिधी
पर्यावरणपूरक शहराच्या निर्मितीसाठी किंवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त काम होण्यासाठी ‘निसर्गदूत फौंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे.
निसर्गदूत फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून (२४ मार्च) फौंडेशनची स्थापना होत असून जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाशेजारील बागेचे सुशोभीकरण करून कामाचा शुभारंभ केला जाणार आहे.
याविषयी राहूल चिकोडे म्हणाले की, सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे सर्वत्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यामध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. याविषयासाठी सर्वांनी आपली जबाबदारी म्हणून पर्यावरण रक्षणाची काम केले पाहिजे. फौंडेशनच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी जास्त ऑक्सिजन देणारी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. तसेच जास्त कार्बन डाय-ऑक्साइड शोषणारी विशिष्ट झाडे लावण्यात येणार आहेत.
पर्यावरणपूरक राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी निसर्गदूत फौंडेशन कार्यरत राहणार असून कोल्हापूर शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी भौगोलिक रचनेनुसार सात विभागात सात टीममध्ये ‘मीही निसर्गदूत’ या भावनेने काम योजले आहे. पर्यावरणपूरक कामासाठी निसर्ग अभ्यासक तसेच अभ्यासू लोकांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्ती, पाणी बचाव, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण याबाबत विविध उपक्रम राबवून त्या माध्यमातून जनजागृतीचे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले, प्रमोद पाटील, चंदन मिरजकर, योगेश चिकोडे, शंतनू मोहिते आदी उपस्थित होते.