सिद्धांत हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटचा नाहक बळी गेलेला नाही: डॉ. वाईकर

Spread the love

• राजेश क्षीरसागर यांचे सर्व आरोप खोटे: डॉ.वाईकर
कोल्हापूर प्रतिनिधी
    सिद्धांत हॉस्पिटलमध्ये नैतिकतेने काम चालू आहे. येथे कोणत्याही पेशंटचा नाहक बळी गेलेला नाही. पेशंटवर कोणतेही चुकीचे उपचार होत नाहीत. मला हेतूपरस्पररित्या सूडबुद्धीने नाहक बदनामी व त्रास देण्याच्या हेतूने राजेश क्षीरसागर असे अशोभनीय कृत्य वारंवार करत आहेत, त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत अशी माहिती सिद्धांत हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ वाईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. अनुष्का वाईकर उपस्थित होत्या.
    डॉ. कौस्तुभ वाईकर म्हणाले की, मी एक महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणीकृत न्यूरोसर्जन असून माझ्याकडे न्यूरोसर्जनसाठी लागणारी सर्व कागदपत्रे व शैक्षणिक अर्हता आहे.  हे राजेश क्षीरसागर यांनी पाहून खात्री करून घ्यावी. हा मुद्दा परत काढला तर  त्यांच्यावर पाच कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल व तशी कायदेशीर नोटीस त्यांना लवकरच देण्यात येईल. कोणताही शासकीय कर अथवा थकबाकी माझ्या नावावर नाही घरफाळा घरमालकाच्या नावे निघतो त्यामुळे त्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा व बोलावे. सतत चुकीचे व खोटे बोलून जनतेची व प्रशासनाची दिशाभूल करू नये. सिद्धांत हॉस्पिटल हे नियमानुसारच बांधलेले आहे व सर्व नियमांची पूर्तता आम्ही केली आहे. राजेश क्षीरसागर यांनी खोटे आरोप करू नयेत.
     ते पुढे म्हणाले की, कोविड-१९  पेशंटच्या बिलाबाबत काही अडचण असेल तर प्रशासनाने नेमलेल्या लेखापरिक्षक यांच्याकडून बिले  तपासून घ्यावी व ज्या पेशंटच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. त्याची पूर्तता शासन आदेशानुसार करण्यात येईल. आजच्या जागतिक महामारीमध्ये सिद्धांत हॉस्पिटलमधील स्टाफ जीव धोक्यात घालून निस्वार्थ जनसेवा करत आहेत. केवळ काही लोकांनी खोट्या तक्रारी दिल्या म्हणून आम्ही रुग्णसेवा बंद करणार नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे ठेवून काम करत आहे. राजेश क्षीरसागर यांनी स्वतः कोरोना सेंटर सुरू करावे व डॉक्टरांची टीम तयार करावी. स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवा करावी व मगच कोल्हापूरच्या जनतेशी बोलावे व तोंड दाखवावे. स्वार्थी राजकारण करू नये. त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही सत्य व तथ्य नसून वैयक्तिक स्वार्थापोटी हे आरोप केले जात आहेत.
———————————————– 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!