आता कोणाशीही चर्चा नाही, सोमवारपासून व्यापार सुरू करणारच: ललित गांधी

Spread the love


• “माझा व्यापार – माझी जबाबदारी” अभियानाची घोषणा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      गेले तीन महिने आमचे व्यवसाय बंद आहेत. ‘उत्पन्न शून्य व खर्चाचा डोंगर’ ही परिस्थिती आता सहन करू शकत नाही. त्यामुळे सोमवारपासून व्यापार सुरू करणारच असा ठाम निर्धार ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे वरिष्ठ उपाध्यक्ष व राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
     जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवूनही शासनाने कोल्हापूरचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आज जनता बझार चौक येथे कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ललित गांधी बोलत होते.
     यावेळी राजारामपुरी परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा व्यापार – माझी जबाबदारी, व्यापार्‍यांवरील अन्यायी लॉकडाऊन रद्द करा, व्यापार्‍यांवरील अन्याय दूर करा, व्यापार आमचा हक्क, आम्हाला व्यापार करू द्या, लॉकडाऊन काळातील घरफाळा, वीज बील, बँक व्याज माफ करा अशा आशयाचे फलक मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित केले होते.
     राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा व वीज बील माफ करावे, बँक कर्जावरील व्याज माफ करावे व व्यापार्‍यांना कमी व्याजाने भांडवल उपलब्ध करून द्यावे यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. व्यापारी आपला व्यापार करताना आवश्यक ती काळाजी घेण्यास समर्थ आहेत. त्यामुळे ‘माझा व्यापार – माझी जबाबदारी’ हे अभियान सुरू करत असल्याची घोषणा ललित गांधी यांनी केली.
      यावेळी विविध व्यापार्‍यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. असोसिएशनचे संचालक माणिक पाटील-चुयेकर यांनी दुकानांच्या वेळांवर कोणतेही निर्बंध असू नयेत, पुर्णवेळ व पुर्ण आठवडा व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली.
      सौ. रक्षा राऊत म्हणाल्या की गेल्या मार्चमध्ये मी केकचा व्यवसाय सुरू केला. एक वर्षात सात महिने व्यापार बंद, मग हा सर्व खर्च करायचा कसा? बस्स आता सहन करता येणार नाही.
      शिवप्रभा लाड यांनी व्यापार्‍यांनाच वेगवेगळी बंधने का असा सवाल करून आता निर्बंध झुगारून देऊ असे सांगितले.
     शाम बासराणी यांनी सरकारने कोरोना काळात जमा केलेल्या दंडाची रक्कम कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना भत्ता म्हणून देण्याची मागणी केली.
     ऑटोमोबाईल स्पेअर पार्टस् डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद कटारीया म्हणाले की, निर्बंध फक्त व्यापार्‍यांनाच लागू आहेत. शहरातील मोठे मॉल्स दिलेल्या सवलतींचा वेळेपेक्षा जास्त वापर करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही असे का?
      सराफ व्यापारी रवि बारस्कर म्हणाले की, या लॉकडाऊनमुळे सराफ व्यापारीसुध्दा भरडला गेला आहे. लॉकडाऊनच्या आधीचा दर आणि आता असलेले सोन्याचे दर यात तफावत आहे. लॉकडाऊनच्या आधी जादा दाराने खरेदी केलेले सोने आताच्या कमी दराने विकावे लागणार आहे अशी परिस्थिती असताना व्यापार बंद असल्यामुळे याचा आर्थिक फटका सराफ व्यापार्‍यांना होत आहे.
     भांडी व्यापारी असोसिएशनचे नितिन मांगलेकर, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे जयंत गोयाणी, किरण नकाते आदि पदाधिकारी तसेच राजारामपुरीतील रमेश कारवेकर, महेश जेवराणी, भरत रावळ, मनोहर पिंजाणी, गजानन पोवार, अमित लोंढे, स्नेहल मगदुम, आयुष हंजे, आशिष पाटुकले यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
     या सभेस कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, राहुल नष्टे यांनी भेट दिली. संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले व राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या निर्णयाला पाठींबा दिला.
स्वागत अनिल पिंजाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजित पारेख यांनी केले.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!