पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको: पोलीस उपायुक्त मितेश घट्टे

Spread the love

• शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन व्याख्यान
कोल्हापूर • प्रतिनिधी
     पत्रकारितेला मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ नये, असे आवाहन पुण्याचे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे यांनी आज येथे केले.
      शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने आयोजित ‘गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते. या ऑनलाईन व्याख्यानाला कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     उपायुक्त घट्टे म्हणाले, पत्रकारांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. काळानुरूप गुन्ह्यांच्या स्वरूपात बदल होत आहे. या बदलाची नोंद पत्रकारांनी घ्यावी. निष्पक्ष, तटस्थ आणि जबाबदार पत्रकारिता समाजाला पुढे घेऊन जाते. पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी अनेक स्रोतांकडून माहिती घ्यावी लागते. परंतु ही माहिती वस्तुनिष्ठ आहे का, याचा विचारही पत्रकारांनी करायला हवा. पोलिस यंत्रणा पत्रकारांना अधिकृत माहिती देतात. या माहितीवर पत्रकारांनी विश्‍वास ठेवावा.
     ते म्हणाले, सूत्रांची माहिती किंवा ऐकीव माहिती दिल्याने अनेकवेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. माहितीची खात्री होणार नसेल, तर अशी माहिती टाळणे योग्य ठरेल. घाईने माहिती देणे अंगलट येऊ शकते. कोणत्याही घटनेचा विविध अंगाने परामर्श घेणेही तितकेच गरजेचे आहे. अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृती जन्माला येऊ पाहत आहे. आर्थिक फसवणुकीसह अनेक प्रकारची व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशावेळी पत्रकारांबरोबरच पोलिस प्रशासनाचीही जबाबदारी वाढली आहे. पोलिस आणि पत्रकार यांनी एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींचा मुकाबला करणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात गुन्हेविषयक पत्रकारिता करत असताना संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेकडे पाहावे, असे आवाहन घट्टे यांनी केले. 
     अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रस्तावना केली. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!