रश्मी शुक्लांकडून अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी ऑफर

Spread the love


     
• ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा  आरोप
  कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार यावे यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांना  कोट्यावधीच्या ऑफर देत होत्या,  असा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.  महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातील २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ या महिनाभरातील रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करा, अशी जोरदार मागणीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
       मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, श्रीमती शुक्ला यांच्यावरील या आरोपांबाबत आमदार म्हणून अपक्ष निवडून आलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही दुजोरा दिला आहे. वास्तविक अशा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा कामांमध्ये असणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेल्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या या फोन टॅपिंग बरोबरच त्यांनी बदल्यांबाबतही माहिती दिली होती. दरम्यान, बहुतांशी बदल्या या अस्थापना मंडळाच्या संमतीने झाल्या होत्या. काही थोड्याच बदल्या बाहेरच्या होत्या.
      कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, श्रीमती रश्मी शुक्ला यांनी समाजविघातक शक्ती असणाऱ्यांचे फोन टॅप करावे लागतील, असे म्हणून परवानगी घेतली आहे. परंतु त्यांनी तर मंत्र्यांचेच फोन रेकॉर्ड केले, ही बाब अत्यंत गंभीर गुन्हा आहे.
      मंत्री मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न विसरून जावं. कारण, महाविकास आघाडी भक्कम आहे. कालच मी टीव्हीवर बघत होतो, श्री. फडणवीस क्रिकेट खेळत होते व ते सांगत होते की, लूज बॉल आला की सीमेपार घालवतो. त्यांना एकही बॉल सीमेपार घालवता आला नाही. एक बॉल उडवून मारला,  तोही झेलबाद झाला असता. त्यांना बॅटिंगही व्यवस्थित करता येत नाही, असे सूचक वक्तव्यही श्री. मुश्रीफ यांनी केले.
      अंबानींच्या घरासमोरील स्फोटक ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरन यांची हत्या प्रकरण हा तपास एटीएसने केला असता तर तो दोनच दिवसात पूर्ण झाला असता. वास्तविक, या तपासाची दिशा भरकटण्यासाठीच विरोधक अशी प्रकरणे उकरून काढत आहेत, असे मला वाटते.
      मंत्री मुश्रीफ म्हणाले, याआधीच्या भाजप सरकारच्या काळात बऱ्याच अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाले असल्यामुळे ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत. वास्तविक त्यांनी कुणा व्यक्तीच्या नव्हे तर सरकारच्या खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांबाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई करतीलच.
     मंत्री मुश्रीफ म्हणाले, रश्मी शुक्ला यांच्या बेकायदेशीर फोन टॅपिंगवरून आणि त्यांनी दिलेल्या बदल्यांच्या माहितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणा भीमदेवी थाटात केलेले आरोप तकलादू आणि लवंगी फटाक्यासारखे होते, हे आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले आहे. हा अहवाल घेऊन ते लगेच दिल्लीला गेले, केंद्रीय गृह सचिवांना दिला व बाहेर येऊन माध्यमांना माहिती दिली. राज्यातील भाजपची सत्ता गेल्यामुळे सुरू असलेला हा थयथयाट आता त्यांनी थांबवावा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!