• प्रताप उर्फ भैय्या माने यांचे आवाहन
कोल्हापूर • प्रतिनिधी
ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले.
कागलमध्ये डी.आर. माने महाविद्यालयात कागल तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. नामदार हसन मुश्रीफ वाढदिवस गौरव समितीच्यावतीने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील होते.
पुढच्या बुधवारी (दि.२१) रामनवमीदिवशी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ६७ वा वाढदिवस आहे.
यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात रक्तपेढ्यामधून रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर कागल, गडहिंग्लज,उत्तूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद मतदार संघनिहाय रक्तदान शिबिरांचे आयोजन करा. शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी गावा-गावात उभे केलेले प्रचंड विकासकाम घरोघरी पोहोचवा. तसेच, गावागावांमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटपही करा.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहितीही श्री. माने यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. विकास कामांबरोबरच त्यांनी जपलेला सेवाभावही तितकाच उत्तुंग आहे.
यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, रमेश माळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, आर. व्ही. पाटील, रमेश तोडकर, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, सतीश घाडगे, विकास पाटील, देवानंद पाटील, दत्ता पाटील, किसन मेटील, नंदकुमार पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.