श्री दत्त कारखान्याच्यावतीने गुरुवारी एकदिवसीय कृषी मेळावा

Spread the love

• कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांची माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
      श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर शिरोळच्यावतीने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यासाठी एकदिवसीय कृषी मेळाव्याचे आयोजन केले आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त मंदिर शेजारी गुरुवारी (दि.५) दुपारी ३ वाजता मेळावा होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी दिली. यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना व ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव उपस्थित होते.
       यावेळी शास्त्रज्ञ डॉ. किशनजी चंद्रा यांचे वेस्ट डि कंपोजर (जिवाणू निर्मिती) आणि अरुण वांद्रे यांचे व्यावसायिक सधन बांबू लागवड या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त उद्योग समुहाचे चेअरमन उद्यानपंडित गणपतरावदादा पाटील असतील. तसेच श्री दत्त साखर कारखान्याचे सर्व संचालक, श्री दत्त कर्मचारी, अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती आहे.
      एम. व्ही. पाटील म्हणाले, डॉ. किशनजी चंद्राजी यांनी भारतीय अनुसंधान केंद्र, गाझियाबाद दिल्ली येथे काम करत असताना देशी गाईच्या पंचगव्यापासून वेस्ट डि कंपोजरचा शोध लावला. सुरूवातीला यामध्ये नत्र, स्फूरद, पालाश व विघटन करणारे (कुजवणारे) जीवाणूंची निर्मिती केली. शेतकरी ते वापरून त्याव्दारे चांगले उत्पादन घेवू लागले. यातूनच अजून संशोधन वाढवत जावून नंतर १० ते १२ प्रकारचे जीवाणू तयार करून तेही शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून दिले. काळानुसार त्यात पुन्हा संशोधन करून सध्या ६०+ प्रकारच्या जीवाणूंचे कल्चर बनवले आहे. याचे वैशिष्ट्य असे की, एकदा एक बाटली खरेदी केली की पुन्हा नवीन विकत घ्यायची गरज नाही. डि कंपोजरपासून विविध निविष्ठा जसे की, दगड रसायन, सुक्ष्मअन्नद्रव्ये, झाडपाला औषधी आदी जे काही बनवायचे ते यात टाकून त्याचे त्यात विघटन होवून ते पिकांना उपलब्ध करून देता येते. अशा विविध प्रकारच्या निविष्ठा कशा बनवाव्यात, कसा वापर करावा, किती करावा, एकरी प्रमाण किती असावे यासह विविध प्रश्नावर या वेस्ट डि कंपोजरचे जनक डॉ. किशनजी चंद्रा मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अरुण वांद्रे यांचे व्यावसायिक सधन बांबू लागवड या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!