दक्षिण कोरियात भारतीयांनी साजरा केला ऑनलाईन गणेशोत्सव

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     दक्षिण कोरियातील भारतीयांनी कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी ऑनलाईन पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. संशोधन, नोकरी, बिझनेस व शिक्षणासाठी दक्षिण कोरिया येथील सेऊल या शहरासह अन्य शहरात राहत असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन तेथे मराठी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत कोरिया येथे दरवर्षी गणेशोत्सव हा सण उत्साहाने पार पाडला जातो. तसेच इतर भारतीय सण देखील साजरे केले जातात.
     कोरियामध्ये गणेशोत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो. घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यादिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात परंतु यावर्षी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सव ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यामध्ये सर्वाना ऑनलाईन आरतीचा मान देऊन श्रींची मनोभावे पूजा केली गेली व पारंपारिक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला.
     कोरिया इंडिया असोसिएशन व इंडियन्स इन कोरिया या दोन भारतीय संस्था नेहमीच भारतीय सण साजरे करण्यासाठी पुढाकार घेत असतात. यावर्षी मंडळाने सर्वांना ऑनलाईन गणेश आरतीचा मान घेण्यासाठी आवाहन केले होते. ऑनलाईन आरती साजरी करण्याचा मान यावर्षी अमित भट, सावंता माळी, हेमराज यादव, अतुल खोत, विकास भोसले, गणेश सरताळे यांच्या कुटुंबियांकडे आला व त्यांनी अतिशय छान पद्धतीने श्रींची आरती केली.
     या ऑनलाईन गणेशोत्सवाचे नियोजन मंडळाचे समन्वयक विनायक पारळे, धीरज मरळे, प्रशांत शेवाळे, अमित भट, अतुल खोत व इतर सदस्यांनी केले. दरवर्षी अमित भट यांच्या घरी मंडळाच्या महागणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.
     मराठी मंडळाने ज्या ज्या वेळी आपल्या मायभूमीला गरज भासेल त्या त्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे. यावर्षी महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्याने या तरुणांनी थेट कोरियामधून  महाराष्ट्राला प्राणवायू पुरविला आहे. तसेच या मंडळामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. गतवर्षी देखील या मराठी मंडळाकडून कोरोनाच्या काळात राज्याला आर्थिक स्वरूपात मदत प्राप्त झाली होती. या व्यतिरिक्त २०१९ च्या महापूर परिस्थिती देखील त्यांनी मदत देऊन दातृत्व दाखविले आहे.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!